पटसंख्या वाढविणारा मास्तर अशी ओळख

नितीन नायगांवकर
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नागपूर - प्रत्येक शिक्षक कुठल्यातरी वैशिष्ट्यामुळे ओळखला जातो आणि विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याच्या मनात तीच ओळख कायम असते. देवरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मंगलमूर्ती सयाम यांची ओळख मात्र जगावेगळी आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांना ‘पटसंख्या वाढविणारा मास्तर’ म्हणून ओळखले जाते. नोकरीत रुजू झाल्यापासून वीस वर्षांमध्ये त्यांनी प्रत्येक शाळेत याची प्रचिती दिली आहे. चार शाळांना नवसंजीवनी देणारे मंगलमूर्ती सयाम यांची कामगिरी ‘आदर्श’ असली, तरीही पुरस्कारांपासून मात्र ते चार हात दूरच आहेत.

देवरी येथील जिल्हा परिषदेची शाळा बंद पडल्यानंतर सयाम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सरकारच्या निधीची प्रतीक्षा न करता स्वतःच्या खिशातून खर्च करायला सुरुवात केली. ही बाब कळल्यावर विभागातील जवळपास अडीचशे प्राथमिक शिक्षकांनी खासगी पातळीवर पैसा उभा करून १२ हजार २५८ रुपये सयाम यांना शाळेच्या डागडुजीसाठी दिले. सयाम यांच्या पाठीशी उभे राहण्यामागेही त्यांची पुण्याईच आहे. १९९८ मध्ये आलेझरी या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत मंगलमूर्ती सयाम रुजू झाले. त्यावेळी फक्त दोनच वर्ग होते. सयाम यांनी टप्प्याटप्प्याने चार वर्ग केले. २००६ मध्ये ते सडक अर्जुनी येथील कोसमघाट या व्याघ्रप्रकल्पांतर्गत असलेल्या गावातील शाळेत रुजू झाले. तेथेही त्यांनी दोन वर्ग आणि विद्यार्थी संख्या वाढवली. 

२०१२ मध्ये नक्षलग्रस्त आणि सरकारने अतसंवेदनशील म्हणून जाहीर केलेल्या रेहळी गावातील शाळेत त्यांची बदली झाली. खरे तर या शाळेत कुणीही जायला तयार नसताना त्यांनी तेथे खास बदली मागून घेतली.

छत्तीसगडी आणि गोंडी बोलणारे विद्यार्थी आणि गावकरी यांच्यात मराठीची गोडी निर्माण केली. येथे एक वर्ग वाढवला व पटसंख्या शंभरच्या वर नेली. त्यानंतर इस्तारी येथील शाळेत त्यांची बदली झाली. त्याठिकाणी सव्वा वर्षांचा कार्यकाळ झाला असताना देवरी  येथे प्रतिनियुक्तीवर त्यांना पाठविण्यात आले. हा संपूर्ण प्रवास देवरीतील शिक्षण क्षेत्राला ठाऊक होता. म्हणूनच देवरीतील बंद शाळा सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आणि त्यांच्या पाठीशी सारे उभेही झाले. कधी पुरस्कारांसाठी प्रयत्न करावासा नाही वाटला का, या प्रश्‍नाला ‘माझे विद्यार्थीच माझा पुरस्कार आहेत’ असे मार्मिक उत्तर ते देतात.

यांची मिळाली साथ...
विशेषतः सरकारी विभागातील एखादी व्यक्ती अशापद्धतिने प्रगती करीत असेल तर अधिकारी वर्ग आकस बाळगून असतो. पण, गटशिक्षणाधिकारी डी. बी. साकुरे, केंद्रप्रमुख एम. जे. सूर्यवंशी, विस्तार अधिकारी आर. एस. येंटरे यांच्यासह शिक्षण विभागातील अनेकांनी मंगलमूर्ती सयाम यांना सातत्याने साथ दिली व विश्‍वास दाखवला.

शिक्षक होण्यापूर्वी मी विद्यार्थी होऊन पालकांशी संपर्क साधतो. त्यांचा माझ्यावर विश्‍वास बसावा, यासाठी उपक्रम आयोजित करतो. हे काम एक दिवस नाही, सातत्याने करतो म्हणून मला प्रत्येक ठिकाणी यश आले. 
- मंगलमूर्ती सयाम, शिक्षक, देवरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Count Increase Teacher Mangalmurti Sayam