esakal | झोपडीपासूनच्या मुक्ततेने मिळाली आयुष्याला कलाटणी
sakal

बोलून बातमी शोधा

रामटेकडी - "एसआरए"च्या प्रथमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीमधील सदनिका.

झोपडीपासूनच्या मुक्ततेने मिळाली आयुष्याला कलाटणी

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे

पुणे - झोपडीभोवती उघडी गटारे, नळावर सततची भांडणे, हाणामारी...शौचालयांच्या दुरवस्थेमुळे होणारी कुचंबणा...असे किती तरी वाईट अनुभव झोपडीत राहताना यायचे. तेव्हा सोसायट्यांमधील फ्लॅटमध्ये राहायला जायचे स्वप्न बघायचो. ‘एसआरए’मुळे ते स्वप्न पूर्ण झाले. आता कोणाची भांडणे नाही की गडबड गोंधळ नाही. अस्वच्छतेमुळे मनही प्रसन्न झाले. माझी मुलं आता आणखी मोठा फ्लॅट घ्यायची स्वप्न बघतायेत. एवढंच नाही, तर मुला-मुलींच्या लग्नासाठी चांगली स्थळ यायला लागलीत ! या भावना आहेत, ४५ वर्षीय सुभाष रूपा कुचेकर यांच्या.  

वर्षानुवर्षे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी, त्यांचे चांगल्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने २००५ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसाअरए) स्थापना केली. मागील दहा-बारा वर्षांत ‘एसआरए’चे काम कासवगतीने चालू असले, तरी त्यातील काही प्रकल्पांमुळे झोपडीधारकांच्या आयुष्यात चांगला बदल घडला. कौटुंबिक ते सामाजिक आयुष्यात हा बदल नेमका कसा घडला, या विषयी नागरिकांनी आपल्या भावना मनमोकळेपणाने मांडल्या.   

रामटेकडी येथील नाईकनवरे डेव्हलपर्सच्या ‘प्रथमा सहकारी गृहरचना संस्थे’च्या अकरा मजली उंचीच्या तीन इमारतीमध्ये साडेपाचशे कुटुंबे वास्तव्य करत आहेत. याच इमारतीत राहणाऱ्या हीना खान स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, तर सुरेखा खंडागळे यांचेही उच्च शिक्षण झाले आहे. त्या दोघीही या इमारतीमधील मुलांच्या खासगी शिकवणी घेत आहेत.

इंग्रजी, विज्ञान, गणितासारखे विषय त्यांना शिकवीत आहेत. ‘‘महिलांना जे पाहिजे, ते सगळं घरातच आहे. घराबाहेर जाण्याची गरजच नाही. मुलांच्या राहणीमानापासून बोलण्यापर्यंत मोठा बदल घडत आहे. मुले अभ्यासाला प्राधान्य देत आहेत. पालकही स्वतः मुलांच्या शिक्षणाबाबत जागरूक झाले आहेत. मुलांचे शाळेमधील मित्र-मैत्रिणी घरी येऊ लागल्या आहेत.’

वाहनचालक भाऊसाहेब क्षीरसागर म्हणाले, ‘‘ चाळीस वर्ष झोपडीत काढली. इतक्‍या मोठ्या सोसायटीत राहायला येऊ, असे स्वप्नातही वाटले नाही. पत्नी, मुले समाधानी आहेत. पूर्वीचे प्रश्‍न सुटले आता चांगले आयुष्य जगता येत आहे.’’

सॅलिसबरी पार्कमधील ढोले मळा वस्तीमधील रहिवाशीही डीपी असोसिएटस या विकसक कंपनीने उभारलेल्या इमारतीमध्ये सहा महिन्यांपूर्वी वास्तव्यास गेले आहेत. एकट्याच राहणाऱ्या हिराबाई गणपत लडकत यांना ६०६ क्रमांकाची सदनिका मिळाली. त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी घरात गटाराचे पाणी घुसायचे. नळावर भांडणे व्हायची. सतत आजारी पडायचो. आता असे काहीच होत नाही. छोटे असले तरी हक्काच आणि चांगले घर मिळाले.’’ 
रिक्षाचालक राजू कुंभार म्हणाले, ‘‘आमच्या झोपडी व परिसर अक्षरशः चिखलातच असायचा. घरमालक व भाडेकरूंची सततची भांडणे होती. आता आम्ही सोसायटीत राहायला आलो, सगळ्याच सुविधा घरात आहेत. मोकळी हवा, सूर्यप्रकाश व स्वच्छता आहे. त्यामुळे मनही कायम प्रसन्न राहते.’’

‘एसआरए’ची सद्यःस्थिती 
* एकूण दाखल योजना - २३८
* पूर्ण झालेल्या योजना - ४६
* उपलब्ध झालेल्या सदनिका - ७७७०

* बांधकाम सुरू असलेल्या योजना - ३७ 
* उपलब्ध होणाऱ्या सदनिका - १०,७७०
* दफ्तरी दाखल असलेल्या योजना - ३७
 

‘एसआरए’ प्रकल्पातील वास्तव्यामुळे झालेले बदल 
शिक्षणाबाबत जागृती 
स्वच्छतेसाठी स्वयंशिस्तीला प्राधान्य मिळाले
राहणीमानामध्ये बदल झाला 
लहान मुलांसाठी खासगी शिकवणी वर्ग 
चोरी, भांडणांचे प्रकार थांबले
झोपडपट्टीधारकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला 
रहिवाशांच्या मुलांची परिचारिकेपासून संगणक अभियंत्यापर्यंत झेप 

loading image