#WednesdayMotivation : दोन्ही पाय नसताना शिवनेरीवर जाण्यात यशस्वी

जितेंद्र मैड 
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे. माझे भाऊ, वडील एखाद्या किल्ल्यावर जाऊन आले की म्हणायचे, किल्ला खूप उंच आहे. लय पाय दुखतात. ते ऐकून मला वाटायचे, की माझ्यासाठी हे अशक्‍य आहे; परंतु दोन्ही पाय नसलेल्या आकाशकडे पाहिले आणि त्याच्यापासून प्रेरणा घेत किल्ला चढायला सुरुवात केली. छत्रपती ‘शिवाजी महाराज की जय’ या घोषणेने आम्हाला आणखीनच स्फुरण येत होते.
- अभिषेक वाघचौरे 

शिवनेरी ट्रेकबद्दल ऐकले तेव्हा मला प्रथम खूप भीती वाटत होती. मी हे करू शकेन का? यावर विश्वास नव्हता. मेक माय ड्रीम फाउंडेशनने आत्मविश्वास दिला. नंतर लक्षात आले, की प्रत्येकात काही ना काही कमतरता आहे; परंतु आत्मविश्वासाच्या बळावर त्यावर मात करणे शक्‍य आहे आणि आम्ही यशस्वी झालो. शिवनेरी चढू शकले. आता जीवनातील कोणत्याही समस्येचा डोंगर पार करणे अशक्‍य वाटत नाही. माझे बीसीएचे शिक्षणही मी यशस्वीपणे पूर्ण करेन.
- कल्याणी काळे

कोथरूड - मुळात पाय नसलेला; पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी करणारा आकाश पवार राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर आणि आता शिवनेरी किल्ला चढून वर गेला. सर्वसामान्यांची दमछाक करणारी किल्ल्यांची चढाई दिव्यांगांसाठी दिव्यच मानावी लागेल; परंतु मेक माय ड्रीम फाउंडेशनने दिलेला आत्मविश्वास आणि स्वयंसेवकांच्या साथीच्या जोरावर तेरा दिव्यांग युवकांनी शिवनेरी किल्ला सर केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आकाशसारखेच दिव्यांग असलेले अभिषेक वाघचौरे, दीक्षा साबळे, इंगळे सायली, कल्याणी काळे, पवन झांबरे, समीर सप्रे, युवराज अहिरे आणि ‘एसएनडीटी’च्या पाच अंध विद्यार्थिनींनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा आनंद घेतला. फाउडेशनच्या संस्थापक मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘संस्थेच्या वतीने २०१२ पासून दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी वाढावी यासाठी आम्ही त्यांना ट्रेकिंगला नेतो. पर्वती, राजमाची, सिंहगड चढाईनंतर या वर्षी शिवनेरी चढाईचे नियोजन आम्ही केले. ट्रेकिंगचे नियोजन करताना ही मुले चढाई करू शकतील का, त्यांना वेळप्रसंगी मदतीसाठी स्वयंसेवक आहेत का? याचे नियोजन करावे लागते; परंतु दिव्यांग मुलांचे बरेच पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी ट्रेकिंगला नेण्याचे टाळतात; परंतु आजवरच्या अनुभवातून आमचे प्रत्येक ट्रेक यशस्वी झाले आणि दिव्यांगांचाही आत्मविश्वास दुणावला.

#Tuesdaymotivation शेतीतील उत्पन्नातून  मुलांना उच्चशिक्षण 

जन्मतः दोन्ही पायांचे पंजे कमरेला चिकटून ९० टक्के अपंगत्व असलेल्या आकाशने दोन्ही हातांच्या बळावर शिवनेरी किल्ला चढायला चार तास व उतरायला दोन तास घेतले. आकाशने बीसीए, डीआयटी, डीडब्ल्यूटी, डीसीए, डीटीपी, टॅली, मोबाईल दुरुस्ती असे कोर्स केले आहेत. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. गाडी चालवतो. संगीताच्या चार परीक्षा त्याने दिल्या आहेत. नाटक, गाणी, खेळ यामध्ये त्याने आत्तापर्यंत पन्नासहून अधिक पदके मिळवली आहेत. आपल्या अपंगत्वाबद्दल कोणतीही तक्रार न करता शिक्षण, कष्ट, कर्तृत्वाने त्याने स्वतःबरोबर कुटुंबाचेही नाव उंचावले आहे. विविध वृत्त वाहिन्या, चॅनेलवर आकाशच्या मुलाखती झाल्या आहेत. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful to go to Shivneri without both feet Motivation