esakal | तारुण्यातील ‘चाळिशी’वर नेत्रतज्ज्ञांची मात
sakal

बोलून बातमी शोधा

Successful surgery is done by Pune ophthalmologists

नाशिक येथील दीपक शिरसूल (वय २१) याला डोळ्यांचा मायनस ३० नंबर होता. तो घालविण्यात नेत्रतज्ज्ञांना यश आले आहे.

तारुण्यातील ‘चाळिशी’वर नेत्रतज्ज्ञांची मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे -  ‘चष्मा नको’ असा विचार आता रुजत असताना चष्म्याचा नंबर कमी करणे, तो घालविण्याच्या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकशास्त्राने शक्‍य झाल्या आहेत; पण मायनस २० पर्यंतचा डोळ्यांचा नंबर घालवता येतो. ही त्याची मर्यादा आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त नंबर घालविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पुण्यातील नेत्रतज्ज्ञांनी केली आहे. 

नाशिक येथील दीपक शिरसूल (वय २१) याला डोळ्यांचा मायनस ३० नंबर होता. तो घालविण्यात नेत्रतज्ज्ञांना यश आले आहे. दीपक याला वयाच्या सातव्या वर्षांपासून चष्मा लागला होता. तो नंबर मायनस ३० पर्यंत वाढला. यामुळे मोठ्या भिंगाच्या चष्म्याने त्याला त्रास होत होता. त्यामुळे त्याला चष्म्याचा नंबर घालविण्याची शस्त्रक्रिया करायची होती. 

लेसरच्या उपचाराने मायनस १० पर्यंतचा डोळ्यांचा नंबर घालवता येतो. ‘आयसीएल’ (डोळ्याच्या आत बसविण्यात येणारी लेन्स) या शस्त्रक्रियेतून मायनस २० पर्यंतच्या नंबरचा चष्म्याचा घालविता येतो; पण दीपकला मायनस तीस नंबरचा चष्मा होता. त्यामुळे मायनस ३० क्रमांकाचा चष्मा घालविण्याचे आव्हान नेत्रतज्ज्ञांपुढे होते. पुण्यातील नेत्रतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे.

डॉ. कांकरिया म्हणाले, ‘‘रुग्णाचे डोळे तपासले, वेगवेगळ्या चाचण्याही केल्या. त्यातून बायोप्टिक्‍स (दोन शस्त्रक्रियांचे मिश्रण) शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करता येतील, असा विश्‍वास वाटला. त्यादृष्टीने शस्त्रक्रियेची तयारी केली. पहिली शस्त्रक्रिया ‘आयसीएल’ तंत्रज्ञानाने केली. त्यातून मायनस ३० पर्यंतचा नंबर मायनस २० ने कमी करण्यात यश आले. त्यामुळे दीपकच्या चष्म्याचा नंबर मायनस ३० वरून मायनस १० पर्यंत कमी झाला. त्यानंतर एक महिन्यात ‘रिलेक्‍स स्माईल’ या सर्वोत्कृष्ट लेसर उपचाराने उर्वरित मायनस १० नंबर घालविण्यात आला. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मायनस ३० नंबर असलेला चष्मा पूर्ण घालविण्यात यश आले.’’

बायोप्टिक्‍स ही दुर्मीळ शस्त्रक्रिया आहे. बुबुळावर लेसर व लेन्स या दोन्हीही पद्धतीचा उपयोग या शस्त्रक्रियेत केला जातो. यातून चष्म्याचा मोठा नंबर घालवणे शक्‍य होते.  
-डॉ. वर्धमान कांकरिया, नेत्रतज्ज्ञ

loading image