ऊसतोड मजुराचा मुलगा बनला पोलिस निरीक्षक

अनिरुद्ध धर्माधिकारी
रविवार, 20 जानेवारी 2019

आष्टी - आर्थिक परिस्थिती बिकट असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलिस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तालुक्‍यातील धामणगाव येथील निसार मुसा पठाण यांची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

आष्टी - आर्थिक परिस्थिती बिकट असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलिस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तालुक्‍यातील धामणगाव येथील निसार मुसा पठाण यांची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

मूळचे धामणगाव येथील असलेले मुसा हुसेन पठाण यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. पत्नी, दोन मुलांच्या चरितार्थासाठी निरक्षर असलेल्या मुसा पठाण यांना पडेल ती कामे करावी लागली. त्यासाठी ते कुटुंबीयांसह अकलूज येथील साखर कारखान्यावर वीस वर्षांपूर्वी स्थलांतरीत झाले. तेथे हमाली; तसेच ऊसतोडीची कामे करून ते कुटुंबाची गुजराण करू लागले. या कामात त्यांच्या पत्नीनेही मोलाची साथ दिली.

दरम्यान, आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत निसारने शालेय जीवनापासूनच अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले. खेळातही त्याने विशेष कौशल्य प्राप्त करीत वेटलिफ्टिंगमध्ये पंजाब, गोवा, केरळ, चेन्नई अशा ठिकाणची मैदाने गाजविली. शिवाय तो आई-वडिलांनाही कष्टात मदत करून त्यांचे ओझे हलके व्हावे यासाठी प्रयत्न करीत राहिला.

आपल्या मुलाने पीएसआय व्हावे, खाकी वर्दीत रुबाबात मिरवावे, ही आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी निसारने स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून दिले. पुण्यातील जनता वसाहत झोपडपट्टीत राहून निसारने स्पर्धा परीक्षेसाठी कष्ट उपसले. विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही क्‍लास न लावता स्वयंअध्ययनावर भर दिला. त्याची मेहनत व आई-वडिलांचे स्वप्न फळाला येऊन अखेर निसारची २०१६-१७ मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून निसारची पोलिस निरीक्षक म्हणून निवड झाली.

कष्ट घेण्याची तयारी व इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर आपले स्वप्न पूर्ण करता येते हेच निसारने दाखवून दिले आहे. डोक्‍यावर वाहिलेल्या ओझ्याचा मुलाने पांग फेडल्याची भावना निसारचे वडील मुसा पठाण यांनी व्यक्त केली.

शालेय-महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्यानुसार वाटचाल करावी. त्यासाठी परिस्थितीला दोष न देता कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. आई-वडील, कुटुंबीयांनी आपल्यासाठी खाल्लेल्या खस्तांची जाणीव ठेवून काहीतरी बनण्याची जिद्द मनी बाळगावी. आत्मविश्वास, कष्ट व जिद्दीने यश नक्कीच मिळेल.
- निसार मुसा पठाण (पोलिस निरीक्षक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane labour son became the police inspector