#SundayMotivation : हुतात्मांच्या कुटुंबीयांना मदतीतून सोसायटीने जपली बांधीलकी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज २ या सोसायटीने गेल्या वर्षापासून हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा उपक्रम राबविला आहे. यंदाही दोन कुटुंबांना सुमारे दोन लाखांची मदत करत समाजाप्रती असलेली बांधीलकी जपली आहे.

नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज २ या सोसायटीने गेल्या वर्षापासून हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा उपक्रम राबविला आहे. यंदाही दोन कुटुंबांना सुमारे दोन लाखांची मदत करत समाजाप्रती असलेली बांधीलकी जपली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दहेगाव बोलका येथील (ता. कोपरगाव, जि. नगर) हुतात्मा सुनील रावसाहेब वालटे हे २२ ऑक्‍टोबर रोजी जम्मू- काश्‍मीरमधील नौशेरा येथे गस्त घालत असताना पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात धारातीर्थी पडले. त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप निवृत्तिवेतन सुरू न झाल्याने आर्थिक चणचण भासत होती. सोसायटीच्या वतीने सुमारे त्यांना सव्वालाखाची मदत करण्यात आली. तर जायगव्हाण (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील हुतात्मा सुरेश भगवान पाटील यांना २००५ मध्ये कुपवाडा येथे वीरमरण आले. मिळणाऱ्या निवृत्तिवेतनावर त्यांची पत्नी सुनीता या तीन मुले व सासू-सासऱ्यांचा सांभाळ करीत होत्या. दोन वर्षांपूर्वी सुनीता यांचेही कर्करोगाने निधन झाले. त्यांच्यानंतर मुलांना निवृत्तिवेतन सुरू लागले. परंतु ती मुले आजोळी निघून गेल्यावर हुतात्मा पाटील यांच्या मातापित्यांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली. सोसायटीच्या वतीने त्यांनाही सुमारे ८२ हजार पाचशे रुपयांची मदत करण्यात आली. 

साडेचारशे सदनिका असलेल्या या सोसायटीतील प्रत्येक कुटुंबाने आर्थिक मदत तर केलीच, परंतु येथील स्वच्छता कर्मचारी, बाहेरील पानटपरीचालक यांनीही खारीचा वाटा उचलला. 

पैशांच्या मदतीबरोबर हुतात्मा सैनिकाची पत्नी, आईवडील यांना साडीचोळी, पोशाख तर त्यांच्या मुलांना सोसायटीतील लहानग्यांनी खेळणी व खाऊ देऊनही कृतज्ञता व्यक्त केली. सुभाषचंद्र रहेजा, आरती जोंधळे, सुधा भान, दीपक केल्हे, भानू घंटी, विजयमाला सावंत, मोहन शेटे यांच्यासह इतर सभासदांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday Motivation Societys commitment to help the martyrs families