शहरातील पहिल्या घोडेस्वार मुंगसे

वैशाली भुते 
सोमवार, 24 एप्रिल 2017

पुणे-दिल्ली मोहीम आजही एखाद्या चित्रपटासारखी डोळ्यांसमोर तरळते. विवाहानंतर घोडेस्वारीला काहीशी खीळ बसली; मात्र ज्ञानप्रबोधिनी प्रशालेने त्यांच्या या कलेला पुन्हा बळ दिले. त्यातून उभारी घेत त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून ही मोहीम अखंडपणे सुरूच ठेवली. गेल्या तीन वर्षांत शंभरहून अधिक नागरिकांना घोडेस्वारीचे प्रशिक्षणही दिले असून, पती संतोष मुंगसे आणि मुलांनाही घोडेस्वारी शिकविली. मुलांनीही अनेक बक्षिसे मिळविली आहेत.
-सुवर्णा मुंगसे, घोडेस्वार  

पिंपरी - महिलेने एकदा ठरवले, तर ती काहीही करू शकते. हे वेळोवेळी अनेक महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. मग याला घोडेस्वारी तरी कशी अपवाद ठरेल? पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या महिला घोडेस्वार सुवर्णा मुंगसे या त्यातील एक उदाहरण. पुणे-दिल्ली अश्‍वारोहण मोहीम फत्ते करणाऱ्याही त्या येथील पहिल्या आणि एकमेव घोडेस्वार. 

पिंपळे निलखचे माहेर असलेल्या मुंगसे वयाच्या विसाव्या वर्षी (कॉलेज जीवनात) पहिल्यांदा घोड्यावर बसल्या. तेथूनच त्यांची घोडेस्वारी सुरू झाली. देशातील पहिली पुणे-दिल्ली अश्‍वारूढ मोहीम त्यांच्या नावावर आहे; तर पुणे-रोहिडा-पुणे ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील पहिले वीटभट्टीचालक कांतिलाल साठे यांच्या त्या कन्या. पूर्वाश्रमीच्या साठे यांना वडिलांकडून इतिहासाचे बाळकडू मिळाले. मुंगसे यांचे शालेय जीवनातच अनेक गड-किल्ले पाहून झाले होते. त्यातून घोडेस्वारीची इच्छा बळावत गेली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच योगायोगाने वृत्तपत्रातील ‘अश्‍वारोहण प्रशिक्षण शिबिर’ची जाहिरात वाचनात आली. मुंगसे यांनी लगेचच या शिबिरामध्ये प्रवेश घेतला. त्यांची घोडेस्वारीतील चपळाई लक्षात घेऊन प्रतिष्ठानने पुणे-रोहिडा-पुणे या मोहिमेसाठी निवड केली. शिवराज्याभिषेकाला सव्वातीनशे वर्षे आणि देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ही मोहीम आखली होती. संपूर्ण भारतभरात शिवछत्रपतींच्या कार्याचा प्रचार व व्यसनमुक्‍तीबाबत जनजागृती करण्याचा त्यामागील हेतू होता. 

चार ते पाच महिन्यांच्या अखंड सरावानंतर ही मोहीम सुरू झाली. १४ जणांच्या या मोहिमेत केवळ दोनच मुलींचा समावेश होता. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील मुंगसे या पहिल्या व एकमेव युवती होत्या. अनेक टक्केटोणपे खात, खाचखळगे-संकटांवर मात करत तब्बल २८ दिवसांनी ही मोहीम पूर्ण झाली. दिल्लीदरबारी त्यांचे मोठे कौतुक झाले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून शरद पवार, सोनिया गांधी, राम नाईक, शीला दीक्षित, सुरेश प्रभू अशा अनेकांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suvarna mungase Horse Rider