
अपयशाने न खचता साधली यशाची ‘तमन्ना’
पिंपरी - घरची परिस्थिती जेमतेम. वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार. आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते. मुस्लीम धर्म. मुलींना जादा शिकविले जात नसतानाही त्यांनी मुलीला पदव्युत्तर पदवीपर्यंत (एमएससी स्टॅटेस्टिक्स) शिकवले. कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात राज्यात मुलींमध्ये आठवी व सर्वसाधारण गटात १०६ वा क्रमांक पटकावत नायब तहसीलदार झाली. ही यशोगाथा आहे, तमन्ना हमीद शेख हिची.
थेरगाव येथील आनंदवन गृहनिर्माण सोसायटीत हमीद व अफसाना शेख राहतात. त्यांची कन्या तमन्ना. तिच्या यशाने शेख यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी तिचे कौतुक केले. कामगारांपासून कांपनीतील व्यवस्थापकांपर्यंत सर्वांनी घरी येऊन शेख कुटुंबीयांचे अभिनंदन केले. तमन्नाचा भाऊ सोहेल हिंजवडीतील इन्फोसीस कंपनीत अकाउन्टंट आहे. तमन्नाचे प्राथमिक शिक्षण थेरगावमधील लक्ष्मीबाई धांईजे विद्यालयात झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण चिंचवडमधील ताराबाई शंकरलाल मुथ्था कन्या प्रशालेत झाले. बीएससी स्टॅटेस्टिक्स पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून व एमएससी स्टॅटेस्टिक्स मॉडर्न महाविद्यालयातून केले.
मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात यावे
मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता कमी आहे. त्यातच मुस्लिम महिला या अधिक संवेदनशील आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी पारंपरिक व आधुनिक शिक्षणाची जोड देऊन मुख्य प्रवाहात यावे. मुलींनाही शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. जसे माझ्या आई-वडिलांनी समाजाचा दबाव झुगारून मला व माझ्या भावाला उच्चशिक्षित केले, तसे करावे, असे मत तमन्नाने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.
पूर्ण वेळ अभ्यास करुन परीक्षा
२०१८ व २०१९ मध्ये तमन्ना स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली. पण, मुख्य परीक्षेमध्ये अपयश आले. त्यामुळे तिला असुरक्षित वाटू लागले. तिने एमएस्सीला प्रवेश घेऊन यश मिळविले. नेट परीक्षाही उत्तीर्ण झाली. कारण, स्पर्धा परीक्षेत अपयश आले, तरी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी तिने अवघड विषय घेऊन यश मिळविले. तिला सहप्राध्यापक पदासाठीही नामांकित महाविद्यालयांनी बोलविले होते. परंतु, कोरोना व लॉकडाउनमुळे ती रुजू झाली नाही. पूर्णवेळ अभ्यास करून डिसेंबर २०२१ मध्ये मुख्य परीक्षा व एप्रिल २०२२ मध्ये मुलाखत दिली आणि यश मिळविले.
स्पर्धा परीक्षांमध्ये संयम, सातत्य व कष्टाशिवाय पर्याय नाही. प्रयत्नांवर व आई-वडील यांच्या कष्टाशी व आपल्या कष्टाशी प्रामाणिक राहून प्रयत्न केले. स्वत:ची क्षमता व कमतरता ओळखून परीक्षेची तयारी केली. परीक्षा देणाऱ्यांची संख्या लाखात असली तरी खरी स्पर्धा स्वत:शीच असते. त्यामुळे शिस्त व नियोजन या दोन घटकांना प्राधान्य देऊन अभ्यास केला. स्पर्धेत विषयांचा अपवाद नाही. मराठी, उर्दू माध्यमातील विद्यार्थीही यश मिळवू शकतात.
- तमन्ना शेख, नवनियुक्त नायब-तहसीलदार