औजारे बॅंकेचा महिलांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

ठाणे - भारत हा शेतीप्रधान देश असला, तरी शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. याची दखल घेऊन पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘औजारे बॅंक’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८२ महिला बचत गटांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला असून औजारे बॅंकेमुळे ग्रामीण भागातील महिला सक्षम बनल्या आहेत. 

ठाणे - भारत हा शेतीप्रधान देश असला, तरी शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. याची दखल घेऊन पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘औजारे बॅंक’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८२ महिला बचत गटांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला असून औजारे बॅंकेमुळे ग्रामीण भागातील महिला सक्षम बनल्या आहेत. 

ठाणे जिल्ह्यात ६० हजार ७१७ हेक्‍टर जमिनीवर भातशेती केली जाते; मात्र उत्पादनखर्चाच्या ९० टक्के खर्च मजुरीवर होत असल्याने हे टाळण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने ‘औजारे बॅंक’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ग्रामसंघांना मदतीचा हात दिला आहे. यात सरकारच्या सेस निधीतून ९० टक्के अनुदानाद्वारे शेतीकामासाठी लागणारी औजारे सात लाख रुपयांच्या मर्यादेत बचत गटांना दिली आहेत. यासाठी दोन कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मिनी टॅक्‍टर, पॉवर टिलर, भातलावणी यंत्र, भातकापणी यंत्र, मळणी यंत्रे देण्यात आली आहेत. आधुनिक औजारे मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची मळणी, खुरपणी आदी कामे मजुरांशिवाय झटपट उरकत असून वेळेवर शेतीची मशागत झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. महिलांनाही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने महिला बचत गट आपली अवजारे इतरांना भाड्याने देऊनही नफा कमावत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्‍यातील ८२ नोंदणीकृत महिला बचतगटांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

ठाणे जिल्ह्यात वनराई बंधारे, जलयुक्त शिवार योजनेबरोबरच औजारे बॅंकेचा उपक्रम कृषी विभागाने राबवल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्यात हरितक्रांती घडत आहे. महिला बचत गटांनी जसा यासाठी पुढाकार घेतला, तसा इतर सेवाभावी संस्थांनीही घेतला पाहिजे.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री. 

ठाणे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला असल्याने मजुरांची वानवा आहे. शेती हंगामात जमीन तयार करणे, चिखलणी, लावणी, काढणी, मळणी या प्रत्येक कामासाठी प्रतिदिन ८७ मजूर लागतात. ३५० रुपये प्रतिदिन मजुरीप्रमाणे दिवसासाठी हेक्‍टरी ३० हजार ४५० रुपये खर्च येतो. शिवाय एकाच वेळी कामे निघाल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होत असल्याने औजारे बॅंक मोलाची ठरली आहे. या यंत्रामुळे लावणीच्या खर्चात ५० टक्के; तर मजुरीच्या खर्चात ७५ टक्के खर्चात बचत होते.
- डॉ. प्रफुल्ल बनसोडे, जिल्हा कृषी अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane news women bank agriculture