‘आमराई’साठी सरसावले हजारो हात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात  हातभार लावला. यावेळी आमराईतील सुमारे हजार झाडांभोवती श्रमदानातून आळी करणे, खत घालणे, पाणी देणे असे उपक्रम केले.

सांगली - सांगलीचे हरित वैभव असलेल्या आमराईच्या समृद्धीसाठी काल शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात  हातभार लावला. यावेळी आमराईतील सुमारे हजार झाडांभोवती श्रमदानातून आळी करणे, खत घालणे, पाणी देणे असे उपक्रम केले.

ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त मौसमी बर्डे यांनी आज व्यक्त केला.

पूर्वनियोजनाप्रमाणे कोणी कोणते काम करायचे याचे काटेकोर नियोजन आधीच केले होते. त्यानुसार कामाचे टोकन वाटप प्रवेशद्वारावर सुरू होते. स्वयंसेवक, कर्मचारी, अधिकारी, व्यक्ती, संस्था यांनी एकाच वेळी सर्व आमराईत नियोजनपूर्वक निश्‍चित ठिकाणी जाऊन श्रमदान केले. आभाळमाया, क्रेडाई, जैन सोशल ग्रुप, आयएमए अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी मोहिमेत सहभागी झाले.

१८४६ मध्ये तयार झालेले संस्थांनी काळातील आमराई उद्यान आजही दिमाखात उभे आहे. म्हणजेच याला १७३ वर्षे पूर्ण होत आहेत. सन १९८५ मध्ये येथील झाडांची मोजदाद करण्यात आली होती. तेव्हा सव्वाशे जातींचे  वृक्ष आमराईत असल्याचे नमूद झाले होते. त्यामध्ये चिंच, गोरखचिंच, चंदन, मोहोगनी, टेंभुर्णी, बेलगामवट, केशिया, रिठा, चेंडूफुल, भद्रलता, राचण, खडशिरणी, कदंब, रुद्राक्ष, सोनचाफा, नागचाफा, नागकेशर, पांगारा, शिसम, अशोक अशा अनेक दुर्मिळ जातींच्या वृक्षांचा समावेश आढळलेला दिसून येतो. पूर्वी आमराईत चंदनाची ही विपुल झाडे होती. कालांतराने हे वृक्ष कमी होत गेले. मात्र, अलीकडे जागरूक निसर्गप्रेमी लोकांमुळे मूळच्या दुर्मिळ वृक्षांची रोपे लावणे, नवीन जातींची लागवड करणे अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष गेले आहे ही एक समाधानाची गोष्ट आहे. दक्षिण महाराष्ट्रातील बोटॅनिकल गार्डन म्हणून आमराईची ओळख तयार व्हावी असा निर्धार उपायुक्त बर्डे यांनी व्यक्त केला.

श्रीमती बर्डे म्हणाल्या,‘‘आज सध्याची रोपे जगवण्यासाठी कामे झाली. मात्र येथील जागेची उपलब्धता पाहता त्याठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये दुर्मिळ वृक्षांची लागवड होऊ शकते. इथे लोक फिरण्यासाठी व व्यायामासाठी येतात त्यांच्यात इथल्या झाडांबद्दल आस्था निर्माण व्हावी. त्याची जबाबदारी त्यांनीच घ्यावी असे नियोजन करून आमराई समृद्ध केली जाईल.’’

दरम्यान, आज नागरिक तसेच संस्थांनी झाडाभोवती  आळे करणे, खत घालणे, पाणी देणे अशी अनेक कामे नागरिकांनी जबाबदारीने पार पाडली. उद्यान अधीक्षक कोरे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी या मोहिमेत भाग घेतला.’’

महिला, चिमुकलेही सहभागी
टीपीटीपी टॉप या संस्थेच्या चिमुकल्यांनीही या उपक्रमास हातभार लावला. त्यांनीही झाडांना आळे करणे, पाणी घालणे अशी कामे केली. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच महिलाही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अनेक नागरिकांनी घरातून साहित्य आणले होते. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. असा उपक्रम सगळ्याच उद्यानांमध्ये राबवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thousands of hands have gathered for Amrai