तीन उच्चशिक्षित वर्गमित्रांनी शोधला गावातच रोजगार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नामांकित हॉटेलांशी टाय-अप
या तरुणांनी सर्वप्रथम शहरातील नामांकित हॉटेलसोबत टाय-अप केले. ग्राहकांना ज्या हॉटेलमधील पदार्थ हवे आहेत, त्या हॉटेलमधून ते पदार्थ घेऊन ग्राहकांना घरपोच पुरविले जातात. हॉटेलचालकांकडून बिलाच्या रकमेवर पाच ते दहा टक्केपर्यंत कमिशन घेतले जाते. सोबतच ग्राहकांकडून बिल रकमेसोबतच घरपोच डिलिव्हरीसाठीचे काही पैसे आकारले जातात. कंपनी, हॉटेलचालकांकडून मिळालेले कमिशन व ग्राहकांकडून मिळालेला डिलिव्हरी चार्ज हे दोन उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.

गंगापूर (जि.औरंगाबाद) - शहरातील तीन उच्चशिक्षित बेरोजगार तरुण वर्गमित्रांनी गावातच रोजगार शोधला आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी तीन वेगवेगळे ऍप तयार करून घेतले असून, "व्हेनडेली' नावाने घरपोच अन्नपदार्थ पुरविण्याची सेवा सुरू केली आहे. तरुणांच्या या संकल्पनेला शहरवासीयांनी प्रतिसाद दिला आहे.

एका क्‍लिकमध्ये घरपोच अन्न मिळत असल्याने ते लोकांसाठी अधिक सोयीस्कर झाले आहे. धावपळीच्या जीवनात घरी स्वयंपाकाला वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण ऑनलाइन जेवण मागवतात. शहरवासीयांना नामांकित हॉटेलचे खाद्यपदार्थ अवघ्या काही मिनिटांत घरपोच येत असल्याने वेळेचीही बचत होते. कुणाल बाविस्कर, दिनेश सारंगधर व रामेश्वर जाधव या तरुण वर्गमित्रांनी एकत्र येऊन हा ऑनलाइन व्यवसाय सुरू केला आहे. येथील मुक्तानंद महाविद्यालयात तिघांनीही वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यातील कुणालने तर पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.

शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी करून कोणाची चाकरी करायची नाही, अशी जिद्द मनाशी बाळगून व्यवसायात उतरण्याचा निर्धार त्यांनी केला. सर्वप्रथम दिनेश सारंगधर याने मित्रासमोर ही कल्पना मांडली. त्यानुसार दोघांनीही तयारी दाखवली. एका नामांकित कंपनीशी संपर्क साधून 80 हजार रुपये भरून तीन वेगवेगळे ऍप तयार करून घेतले. त्याला "व्हेनडेली' असे नाव दिले. यात ग्राहक, हॉटेलचालक व कंपनी यांचा समावेश होता. ग्राहकांसाठीचे ऍप एक हजार आठशे रुपये भरून प्लेस्टोअरवर अपलोड केले. याची माहिती लोकांना व्हावी म्हणून शहरात बॅनर व माहिती पत्रक वाटप केले. या माध्यमातून शहरवासीयांना माहिती होत गेली. अनेकांनी ऍप डाऊनलोड करून भाजी ऑर्डर करण्यास सुरवात केली. आज एका महिन्यात रोजच्या तीस ऑर्डर मिळत आहेत. प्रत्येक ऑर्डरमागे वीस रुपये घरपोच करण्याचे शुल्क आकारले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Higher Educated Classmates Search Employment In Village