तीन वर्षांचा श्रेयस बनलाय आई-वडिलांची ‘दृष्टी’

- संदेश सप्रे
मंगळवार, 14 मार्च 2017

अंध कुटुंबाची कथा - युयुत्सु आर्तेंचा मदतीचा हात

देवरूख - वयाच्या सातव्या वर्षी अचानक मोठा ताप आला आणि त्यांना आपली दृष्टी कायमची गमवावी लागली. तरीही जिद्द न हरता त्यांनी छोटे मोठे काम सुरूच ठेवले. जन्मजात अंध मुलीशी विवाह करून संसारगाडा सुरू केला. या दोघांच्याही जीवनात श्रेयसरूपी प्रकाशाचा नवा किरण जन्माला आला. आई-वडील दोघेही अंध असले तरी ३ वर्षांचा चिमुकला श्रेयस त्या दोघांची दृष्टी बनला आहे. आपल्या चिमुकल्यासह संसाराचा गाडा ओढताना अंधत्व कुठेही आड येत नाही. संगमेश्‍वर तालुक्‍यातील देवरूखजवळच्या माळवाशी गावातील अंकुश करंडे यांच्या जिद्दीची ही कहाणी.

स्वतः दृष्टिहीन, बायकोही अंध; अशाही स्थितीत ते मुंबईत राहून आपला उदरनिर्वाह चालवतात. स्वतः अंध असल्याने आपल्या संसारात डोळस महिला येणार नाही हे वास्तव जाणून त्यांनी साताऱ्यातील जन्मतःच अंध असणाऱ्या सीमा यांच्याशी विवाह केला. त्यांना ३ वर्षांचा श्रेयस नावाचा गोंडस मुलगा आहे. हा मुलगाच या दोघांचेही डोळे बनून त्यांना मार्ग दाखवतो. आजकालच्या जमान्यात मोठ्या माणसांकडून आई-वडिलांचे होणारे हाल सतत कानावर पडतात; मात्र आधुनिक श्रावणबाळाची ही कथा आदर्श आहे. मुंबईत असलेले अंकुश आणि सीमा सध्या शिमगोत्सवानिमित्त गावी आले आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी देवरुखात फेरफटका मारला. त्यावेळी चिमुकला श्रेयस त्यांना मार्ग दाखवत होता. अंध आई-वडिलांचा भार छोट्या वयातच खांद्यावर घेऊन त्यांना मार्ग दाखवणारा श्रेयस पाहून अनेकांचे काळीज हेलावले.

आपल्या अंधत्वामुळे शांत न बसता अंकुश रेल्वेत छोट्या-मोठ्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह तर करतातच; पण स्पीकर दुरुस्तीसह विद्युत उपकरणांची कामेही ते करतात. त्यांचा दुसरा भाऊ व भावजयही अंधच आहेत. घरात चार व्यक्‍ती अंध असतानाही त्यांची जगण्याची धडपड पाहून देवरूखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. समाजातील इतरही दानशूरांना या कुटुंबाला मदत करायची असल्यास त्यांनी युयुत्सु रमाकांत आर्ते यांच्याशी संपर्क साधावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three years old Shreyas helping his parents to see the world through his eyes

टॅग्स