सलाइनद्वारे जगविली २४ हजार झाडे!

ज्ञानेश्वर रायते
मंगळवार, 23 जुलै 2019

ओलावा धरून ठेवण्याचा प्रयोग
उपवनसंरक्षक लक्ष्मी ए, सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव व वनपरिक्षेत्र अधिकारी गौरीशंकर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेऊन हळद, हिंग, कापूर यांच्या द्रावणात बुडवून रोपाच्या पिशव्या ठेवल्या. हे घटक ओलावा धरून ठेवतात. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला असे वनपाल टी. जे. जराड, अमोल पाचपुते यांनी आज सांगितले.

बारामती - तालुक्‍यात मागील वर्षी डिसेंबरपासून टॅंकर सुरू करावे लागले, तेव्हापासून काल परवाचा पाऊस पडेपर्यंत वन विभागाचा कस लागला. मात्र, माणसांची तहान भागविण्यासाठी पाणी तोकडे पडत असताना थेंब थेंबाचे मोल जपत वन विभागाने २४ हजार झाडे सलाइनद्वारे पाणी सोडून जगवली... एक फुटाचा अंकुर या काळात चार फुटांवर पोचला!

राज्यभर ३३ कोटी वृक्षलागवडीची घोषणा गाजते आहे. सरकार घोषणा आणि खर्चही करते. मात्र ती घोषणा खऱ्या अर्थाने अमलात आणण्यासाठी हजारो हात झटत असतात. उद्या (ता.२३) होत असलेल्या वनसंवर्धन दिनानिमित्त बारामतीत केलेल्या प्रयोगाची दखल राज्याने घ्यावी अशीच आहे. मागील वर्षी पावसाळ्यात तालुक्‍यातील उंडवडी, सोनवडी, शिर्सुफळ, पारवडी, कण्हेरी, पिंपळी, सोनकसवाडी व मुढाळे या आठ वनपरिक्षेत्रात जून महिन्यात वनखात्याने पावणेदोन लाख रोपे लावली. दुर्दैवाने या वर्षी अनेक ठिकाणी अवघा ५५ ते ६० मिलिमीटर पाऊस पडला. 

रोपे जळून चालल्याने वनखात्याने झाडाच्या मुळाशी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या लावल्या. डिसेंबरपासून काल परवापर्यंत या बाटल्या या झाडांच्या मुळाशी होत्या. ऐन उन्हाळ्यात ४५ अंश तापमानातही या बाटल्यांनी झाडांमध्ये जिवंतपणा ठेवला. त्यातून २४ हजार रोपे शब्दशः तगली. बाटलीच्या टोपणास छिद्र पाडून त्यातून सुतळी गाठ बाहेर काढून रोपाच्या मुळाशी सोडण्याची व बाटली उपडी ठेवून ती अर्धी मातीत गाडण्याची ही कल्पना यशस्वी ठरली आहे. 

या व्यतिरिक्त वनविभागाने अतिक्रमणाविरुद्ध केलेल्या मोहिमेतून ताब्यात घेतलेल्या वनक्षेत्रात आणखी १२ हजार झाडे जगवली आहेत. एकंदरीत जी झाडे या उन्हाळ्यात टिकलीच नसती, ती झाडे या अभिनव कल्पनेने जगली आणि वन विभागाने खऱ्या अर्थाने वनसंवर्धनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Plantation by Saline Water Tree Saving