Video : जिद्दीच्या संघर्षावर ‘तृप्ती’ची मोहोर!

सु. ल. खुटवड 
Saturday, 1 February 2020

आयुष्यात अनेक संकटांवर तृप्तीने मात केली असून, संघर्षाला आनंद व उत्साहाची जोड दिली आहे. आता रडायचं नाही; लढायचं आणि परत उभं राहून दाखवायचं, हाच तिच्या जीवनाचा मंत्र आहे. 

पुणे - मोत्यासारखे अक्षर, कॅलिग्राफी व ग्राफिक डिझायनिंगवर प्रभुत्व, छायाचित्रांबरोबरच अल्बम डिझायनिंगची व्यावसायिक कामे, शेअर मार्केटमधील जाणकार, इतकेच काय; पण जलतरण स्पर्धेतही तीन सुवर्णपदके. कंबरेखाली कसल्याही संवेदना नसलेल्या तृप्ती दिलीप चोरडिया या अष्टपैलू तरुणीच्या संघर्षाची ही कथा. सध्या ती राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे.

आयुष्यात अनेक संकटांवर तृप्तीने मात केली असून, संघर्षाला आनंद व उत्साहाची जोड दिली आहे. आता रडायचं नाही; लढायचं आणि परत उभं राहून दाखवायचं, हाच तिच्या जीवनाचा मंत्र आहे. 

तृप्तीला ९० टक्के अपंगत्व आहे. चाकाची खुर्चीच तिच्यासाठी पाय आहेत. मात्र, कणखरपणे ती आयुष्याला सामोरे जात आहे. तृप्तीच्या मणक्‍यावर जन्मतःच चरबीची गाठ होती. त्यामुळे कमरेखाली रक्तपुरवठा करणाऱ्या नसा बंद झाल्या. ती सहा महिन्यांची असताना ही बाब निदर्शनास आली. ती तेरा महिन्यांची असताना मुंबईत शस्त्रक्रिया केली. मात्र, त्यात यश आले नाही. डॉक्‍टरांनी रोज तिला पोहण्याचा सल्ला दिला. चौथ्या वर्षापासून तिचा पोहण्याचा व्यायाम सुरू झाला. गेली २८ वर्षे तो सुरूच आहे.  तृप्तीला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत कोणी प्रवेश दिला नाही. अखेर बिबवेवाडीतील विद्या निकेतन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिला प्रवेश मिळाला. तिथे ती दहावीपर्यंत शिकली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच शाळेने तिला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. ‘शाळेने केलेला हा माझा सर्वोच्च सन्मान आहे’, अशी भावना ती व्यक्त करते.  

शिक्षणानंतर भावाच्या ऑफिसमध्ये तिने ऑनलाइन शेअर मार्केटचे काम पाहिले. तिला कॅलिग्राफीची आवड निर्माण झाली. तिने एका संस्थेतून हा कोर्स पूर्ण केला. त्याचवेळी तिची सूरज पठारे या तरुणाबरोबर ओळख झाली. त्यानंतर अजून काहीतरी नवीन शिकावं, या उद्देशाने या दोघांनी कोथरूडमध्ये अल्बम डिझायनिंगचा कोर्स केला. त्यानंतर ‘डिझाईन डेस्टिनेशन’ या नावाने कंपनी स्थापन केली. तृप्तीच्या प्रत्येक उपक्रमाबरोबरच स्पर्धेसाठीही सूरजचे प्रोत्साहन असते.  

‘‘संघर्षाच्या काळात वडील दिलीप व आई सरोज चोरडिया, विद्या निकेतनचे सुभाष आणि सुभाषिता शेट्ये यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच संकटांशी सामना करण्याचे धैर्य अंगी निर्माण झाले,’’ अशी भावना तृप्तीने व्यक्त केली. 

जलतरण स्पर्धेतील भरारी
सहकारनगरमधील जलतरण तलावात पोहत असताना तृप्तीची घनश्‍याम मारणे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचाच परिपाक म्हणजे मुंबई येथे जलतरण स्पर्धेत तिला तीन सुवर्णपदके मिळाली; तसेच सर्वसामान्य महिलां गटातही तिने बक्षीस पटकावले. आता ती राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trupi Chordia Story