TuesdayMotivation : रस्त्यावर येऊनही गर्दीच्या मनात घर करणारा कलाकार

कुणाल कुंजीर
Tuesday, 19 November 2019

सातवी शिकलेले राजेंद्र यांचा बालपणापासूनच चित्रकलेकडे कल होता. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर कौटुंबिक वादामुळे घर सुटले. आर्थिक परिस्थितीमुळे चित्रकला बाजूला ठेवून त्यांना नाइलाजास्तव वेटर, सफाई कर्मचारी, मजुरी यांसारखी कामे करावी लागली. पुढे एका अपघातामुळे त्यांना त्यांची आवड जोपासण्याची संधी पुन्हा मिळाली.

पुणे- पुणे हे असंख्य कलाकारांचे घर आहे. मात्र, याच पुण्यात घर नसलेला एक कलाकार आहे. राजेंद्र खळे त्याचे नाव. असाधारण प्रतिभा लाभलेला हा माणूस बेघर आहे; तसेच एक पायही गमावला आहे; पण जेव्हा तो रस्त्यावरच चित्र रेखाटू लागतो, तेव्हा जमलेल्या गर्दीच्या मनात घर करून जातो.

सातवी शिकलेले राजेंद्र यांचा बालपणापासूनच चित्रकलेकडे कल होता. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर कौटुंबिक वादामुळे घर सुटले. आर्थिक परिस्थितीमुळे चित्रकला बाजूला ठेवून त्यांना नाइलाजास्तव वेटर, सफाई कर्मचारी, मजुरी यांसारखी कामे करावी लागली. पुढे एका अपघातामुळे त्यांना त्यांची आवड जोपासण्याची संधी पुन्हा मिळाली.

राजेंद्र सांगतात, ‘‘सात वर्षांपूर्वी अपघातात मी माझा उजवा पाय गमावला. तेव्हा नोकरीचा प्रयत्न केला; मात्र, माझ्यावर मागून खाण्याची वेळ आणली. हे माझा स्वाभिमान दुखावणारे होते, म्हणून चित्रकलेकडे पुन्हा वळालो. तेव्हा लोकांनी माझ्या हातांना काम देऊन सन्मानाने जगण्याची संधी दिली.’’

रात्रीची झोप अन्‌ दिवसभराचे काम, यासाठी स. प. आणि फर्ग्युसन महाविद्यालयांबाहेरच्या फुटपाथवर दिवस-रात्र चित्र काढणाऱ्या राजेंद्र यांना स्वत:चे कुटुंब नाही. मात्र, कलेद्वारे ग्राहकांच्या कुटुंबात ते जिव्हाळा निर्माण करतात. ते सांगतात, ‘‘जेव्हा एखादी मुलगी तिच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त माझ्याकडून स्केच बनवून गिफ्ट करते, तेव्हा मला कुटुंब नसल्याचे दुःख हलके होते.’’ ५४ वर्षीय राजेंद्र जन्मापासून पुण्यात राहिलेत. पुण्याबाहेरचे जग क्वचितच पाहिलेल्या कलाकाराची कला ते जगभरात पोचवत आहेत. राजेंद्र सांगतात, ‘‘श्रीमंत लोक परदेशातील नातेवाइकांना माझ्याकडून स्केच बनवून देतात तेव्हा मला माझ्या गरिबीची लाज वाटत नाही, कलेच्या श्रीमंतीने मला आत्मनिर्भर बनवले आहे.’’ 

राजेंद्र सांगतात, ‘‘ तीन हजार चित्र रेखाटले आहेत. लोकांनी मला ‘मनोरमा हॉल’मधील अपंगांच्या चित्रप्रदर्शनात सहभागी करून घेतले. वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘ब्यूटीफुल माइंड’ स्पर्धेत परीक्षक म्हणून बोलावले. ’’

स्वत:च्या क्षमतेस माणूस कोणत्याही परिस्थितीत न्याय देऊ शकतो, याचे राजेंद्र खळे जिवंत उदाहरण आहेत.
- शिवानी पाटील, नागरिक

 राजेंद्र एक असाधारण योद्धा आहेत. विपरीत परिस्थितीत कलेची जोपासना करत ते आयुष्याशी संघर्ष करीत आहेत. काही मदत हवी का, असे विचारले असता ते माझी लढाई स्वतःलाच लढू द्या, असे सांगतात.
- अलकानंद अभ्यंकर, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuesday Motivation artist Rajendra khale success story in Pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: