धुरखेड्याचा ‘वहाब’ साकारणार विज्ञानग्राम

विनोद पिल्लेवान
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

उमरेड - वहाब शेख २७ वर्षीय तरुण साकारतोय विज्ञानग्राम. उमरेडपासून ५ किलोमीटर अंतरावर धुरखेडा या २५०० लोकवस्तीच्या गावात. यासाठी त्याच्याजवळ भांडवल नाही. आहे फक्त त्या खेडेगावातील चिमुकल्यांची साथ. 

उमरेड - वहाब शेख २७ वर्षीय तरुण साकारतोय विज्ञानग्राम. उमरेडपासून ५ किलोमीटर अंतरावर धुरखेडा या २५०० लोकवस्तीच्या गावात. यासाठी त्याच्याजवळ भांडवल नाही. आहे फक्त त्या खेडेगावातील चिमुकल्यांची साथ. 

कोण हा वहाब शेख? ‘नासा’ या अंतराळ संस्थेत काम करून आलेला तरुण. शिक्षण फक्त ११ अकरावी. ज्ञान मात्र शास्त्रज्ञाएवढे. इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे ‘प्रोजेक्‍ट’ बनवून देणारा हा वहाब नागपूरच्या रायसोनी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी जुळला आहे. तेथे त्याला प्रोजेक्‍ट इंचार्ज  म्हणून काम मिळाले. तेथूनच त्याची ३१ मार्च २०१६ ला नासा या अंतराळ शोध संस्थेत बोलावणे आले. तेथून परत आल्यावर त्याने आपल्या गावातून काहीतरी नवीन करण्यासाठी  उपक्रम हाती घेतला. आज त्या गावातील चिमुकली मुलेही नवनवीन प्रयोगात गुंतले आहेत. याच वर्षी उमरेड येथे विदर्भस्तरीय झालेल्या कृषी मेळाव्यात त्याने बनविलेल्या ‘ग्रासकटर’ला पारितोषिक मिळविले. अशोक विद्यालयात झालेल्या विज्ञान मेळाव्यात याचा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकाविली. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांसाठी त्याची प्रयोगशाळा २४ तास सुरू असते. कुठलीही फी नाही, की वयाचे बंधन नाही. पाहिजे ती फक्त जिद्द ! एका खोलीत त्याची प्रयोगशाळा अद्वितीय आहे. वेगवेगळी उपकरणे त्यांनी बनविलेली आहेत.

येणाऱ्याला तोंडात बोटे घालायला लावते. रोबोटिक्‍स, ऐरोनॉटिक्‍स, इलेक्‍ट्रोनिक्‍स, कॉम्प्युटर, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, मेकंट्रोनिक्‍स या विविध विभागाची संशोधन येथे सुरू असते. या प्रयोगशाळेत वेगवेगळे काम करणारा रोबोट साकार होत आहे. झाडावरील फळे तोडण्याचे यंत्र त्यांनी विकसित केले आहे. मोटारबाइक वॉटरपंप आहे. असे अनेक उपयोगी यंत्र तयार होत आहेत. डिफेन्समध्ये रोबोटिक क्षेत्रात तो सध्या ‘क्रिएटिव्ह हेड’ म्हणून कार्य करीत आहे. मिळणाऱ्या मानधनावर  त्याची ही प्रयोगशाळा सुरू आहे. नासामध्ये त्याची निवड झाल्यावर तो अकरावीपर्यंत ज्या ज्या शाळेत शिकला त्या त्या  शाळेने त्याचा सत्कार सोहळा आयोजिला. राजकीय लोकांपासून ते सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांनी त्याचा सत्कार केला. पण, त्याचे मन या गोष्टीला तयार नाही. तो म्हणतो मला हारतुरे नको, सत्कार नको, पाहिजे ती आर्थिक मदत. ! तीसुद्धा यासाठी की ग्रामीण भागातही योग्य मार्गदर्शन मिळाले तर माझ्यासारखे कित्येक ‘वहाब’ तयार होतील. आपल्या  देशाचे नाव टेक्‍नॉलॉजीमध्ये समोर नेणाऱ्यांसाठी अनेक कल्पना आहेत.

त्यासाठी लागणारा प्लॅटफॉर्म आहे. नाही ती फक्त आर्थिक बाब. शासन प्रशासनाला विनंती अर्ज सादर केले आहेत. पाठपुरावा सुरू आहे. पण वेळ निघून केल्यावर काही फायदा नाही. त्याच्या तुटपुंज्या मिळकतीवर ही प्रयोगशाळा आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. कित्येक लोक येथे भेट देतात. सेल्फी काढतात. इंजिनिअरिंगची मुले येतात...येथून कल्पना घेऊन जातात. पण, समोरचे भविष्य त्याला या सगळ्यात दिसत नाही. तो म्हणतो, मी ज्या गावाचा आहे, ते गाव विज्ञान गाव म्हणून देश विदेशात नावारूपास यावे, ही त्याची इच्छा. त्याच्या या स्वप्नात साथ आहे त्याच्या घरच्यांची व काही गावकऱ्यांची. त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यात प्रत्येक कार्यात साथ देणाऱ्या रिजवान खानची. त्याच्या स्वप्नाला पंख फुटू दे, त्याच्या इच्छेची स्वप्नपूर्ती होऊ दे... त्याच्या कार्याकडे पाहून कुणीही अशीच ‘इबादत’ करणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vahab shaikh Science village dhurkheda village motivation