पतींच्या स्मृत्यर्थ वटवृक्षारोपण!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

वडाच्या झाडासह इतर लावलेल्या झाडांचे संवर्धन काळजीपूर्वक केले जाणार असून, असे उपक्रम सर्वत्र राबवल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होईल.
- वर्षा जवळ, सरपंच, जवळवाडी

मेढा - जवळवाडी (ता. जावळी) येथील विधवा महिलांनी आपल्या पतींच्या स्मृती जपण्यासाठी वटवृक्षारोपण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवला. सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वटपौर्णिमा म्हटले की आठवते सावित्री. तिने यमाच्या दारातून आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणल्याचे सांगितले जाते. वाढते प्रदूषण, अपघात, व्यसनाधिनता, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर याचा शेतीवर व पिकांवर होणारा परिणाम यामुळे कोणत्या माणसाला कोणता आजार होईल आणि  जीवनावर काय परिणाम होईल, याचा नेम नाही. दिवसेंदिवस प्राणवायू देणारी झाडे कमी होत असून त्यामुळे प्रदूषण वाढत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्या सावित्रीने आपल्या सत्यवान नावाच्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळविले, पण आता ते शक्‍य होणार नाही. पण, आपल्या गेलेल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी प्राणवायू देणारी वड, पिंपळ, कडुनिंब यांची झाडे लावून हजारो लोकांचे प्रदूषणाने होणारे पतन थांबविण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केल्याचे या महिलांनी सांगितले. सामाजिक जाणिवेतून जवळवाडी ग्रामपंचायतीने हाती घेतलेला हा उपक्रम समाजात एक आदर्श निर्माण करणार आहे.

तुळशीला जसे रोज महिला पाणी घालतात, त्याच पध्दतीने या रोपांना रोज या महिला पाणी घालणार असून आपल्या पतीच्या स्मृती कायम या झाडाच्या रूपाने जपण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत. या उपक्रमात फुलाबाई जगन्नाथ साखरे, मीराबाई ज्ञानदेव जवळ, भारती बबन जवळ, रंजना गणेश हिरवे, मंदा रामचंद्र जवळ, लक्ष्मी सर्जेराव जवळ या महिलांनी आपल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण केले. या वेळी सरपंच वर्षा जवळ, सदस्या गीता लोखंडे, माजी सरपंच माधवी धनावडे, जयश्री जवळ, शालिनी जवळ यांच्यासह गावातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vatpournima Widow Women Tree Plantation