विशेष मुलांचा बनला आधारवड

दत्ता म्हसकर  
शुक्रवार, 3 मे 2019

विकास घोगरे या युवकाने समाजातील दुर्बल, गरीब, वंचित विशेष मुलांसाठी काम करण्याच्या हेतूने सुमारे सात वर्षांपूर्वी ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ची स्थापना केली.  आज या सेंटरमध्ये बावीस विशेष विद्यार्थी शिकत असून, चौदा निवासी शिक्षण घेत आहेत.

जुन्नर - विकास घोगरे या युवकाने समाजातील दुर्बल, गरीब, वंचित विशेष मुलांसाठी काम करण्याच्या हेतूने सुमारे सात वर्षांपूर्वी ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ची स्थापना केली. 

आज या सेंटरमध्ये बावीस विशेष विद्यार्थी शिकत असून, चौदा निवासी शिक्षण घेत आहेत. स्वत: उन्हात उभे राहत इतरांना सावली देणाऱ्या काही मोजक्‍या संस्थांपैकी जुन्नरची ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ ही संस्था आहे. मात्र, ती चालविण्यासाठी संस्था चालविणाऱ्या युवकांना संघर्ष करावा लागत आहे. 

**************************************

संपर्क : माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर, विकास घोगरे 
९५९४९६९६३८  /  ७९७२४४४०८९

**************************************

या संस्थेत बावीस कुटुंबीय आहेत. या सर्व मुलांसाठी दोन्ही वेळचे जेवण आणि नाश्‍ता बनवून देण्याचे काम विकास यांची आई आणि पत्नी करते. पत्नी आश्विनी प्रशिक्षित असून, आईच्या मायेने मुलांची काळजी घेते, त्यांना शिकवते. त्यांची मुलगी मुलांना गाणी-गोष्टी आणि नृत्य शिकवते. घोगरे यांच्या कुटुंबाने बावीस जणांसाठी वाहून घेतले आहे. 

सातवीनंतर वडिलांनी शिकून काय करणार म्हणून विकासला शाळा सोडण्यास सांगितले. तरीही, छोटी-मोठी कामे करून, आईसोबत शेतमजुरी करत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावी नापास झाल्याने आलेल्या नैराश्‍यामुळे गाव सोडून मुंबईला एका नातेवाइकाकडे राहण्यास गेले. त्यांना मुंबईमध्ये घरकामाची नोकरीही मिळाली. विकास यांनी सात वर्षे घरगडी म्हणून काम केले. ते करत असताना डीटीपी, मराठी टायपिंग शिकून घेतले. पुन्हा बारावीची परीक्षा देऊन मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. डी. एस. ई. फॉर मेन्टली रिटायर्ड, बी.एड, एम.एस.डब्ल्यू याबरोबर एन.सी.सी., भरतनाट्यम, लोककला प्रशिक्षण, चित्रकला प्रशिक्षण त्यांनी घेतले. 

एका महिलेच्या मतिमंद मुलास सांभाळण्याचे काम करताना या मुलांचे जगणे कसे असते? याची जाणीव झाली. दरम्यान इतर मतिमंद मुलांशी ओळखही झाली. त्यांचे जगणे आणि जिवंत असूनही जिवंत नसणे मनाला वेदना देत गेले. आपल्या आयुष्याचे दु:ख या मुलांच्या जगण्यापलीकडे काहीच नाही याची जाणीव झाली. या निष्पाप बालकांसाठी काहीतरी केले पाहिजे या विचारातून ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ सुरू केले. 

सेंटरमध्ये राबवले जाणारे उपक्रम
हिंमत : ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी विविध थेरपीज.
फुलपाखरू शैक्षणिक उपक्रम : ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शैक्षणिक मार्गदर्शन.
स्वावलंबन : व्यवसायपूर्व प्रशिक्षण केंद्र. 
नंदनवन वसतिगृह : वय वर्षे १८ पासून पुढील केवळ मुलांसाठी निवासाची सोय.
बळिराजा शेती प्रकल्प : यामध्ये मुलांकडून सेंद्रिय पद्धतीने शेती करून घेतली जाते.
रंग माझा वेगळा : दिव्यांग कलाकारांचा ऑर्केस्ट्रा.

केंद्राचे संकल्प 
पुढील काळात गरीब गरजू शंभरहून अधिक मतिमंद, दिव्यांग बांधवांकरिता पुनर्वसन, सर्वांगीण विकास, सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यःस्थितीत ‘नंदनवन’ला मासिक अंदाजे ७० हजार रुपये खर्च येतो. ही रक्कम उभी करण्यास खूप कष्ट पडतात. यासाठी वार्षिक नंदनवन पालकत्व, भोजन निधी योजना, वाढदिवस भेट आदी उपक्रम राबविले जातात. रूपाली सचिन बोकरिया यांनी दहा गुंठे जमीन विनामूल्य दिली आहे. सध्या बांधकामासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे. 

‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ला एकदा तरी भेट द्या, सूचना, मार्गदर्शन व सहकार्य करा, असे आवाहन घोगरे कुटुंबीयांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vikas ghogre help Special kids