म्हसवडचे विक्रम वीरकर तिसऱ्या प्रयत्नांत आयएएस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा अंतिम परीक्षेत म्हसवड (वीरकरवाडी) येथील विक्रम जगन्नाथ वीरकर यांनी बाजी मारली असून, देशात ३४७ वा क्रमांक मिळवून ‘आयएएस’ झाले.

म्हसवड - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा अंतिम परीक्षेत म्हसवड (वीरकरवाडी) येथील विक्रम जगन्नाथ वीरकर यांनी बाजी मारली असून, देशात ३४७ वा क्रमांक मिळवून ‘आयएएस’ झाले.

श्री. वीरकर यांनी यापूर्वीही २०१५ मध्ये या परीक्षेत ८१२ व्या क्रमांकाने प्रथम यश संपादन केले होते. त्यानंतर २०१६ मधील परीक्षेत ७८४ वा क्रमांक मिळवून दुसऱ्यांदा यश संपादन करून पणजी (गोवा) येथे आयकर आयुक्त पदावर कार्यरत झाले. या पदावर सध्या कार्यरत असतानाच त्यांनी पुन्हा आपले नशीब आजमावण्यास यंदाची लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि चढत्या क्रमांकाने म्हणजेच ३४७ वा क्रमांक मिळवत ‘आयएएस’ झाले आहेत. या परीक्षेस दहा ६९ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. चार लाख ९३ हजार ९७२ विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिलेली होती. त्यातील एक हजार ९९४ विद्यार्थ्यांच्या मुलाखती गेल्या महिन्यात झाल्या होत्या. श्री. वीरकर यांचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षण विस्तार अधिकारी असून, त्यांनी विक्रम यास लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत प्रोत्साहन दिले. विक्रम यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विक्रम हा प्रथमपासूनच अभ्यासू होता. जिद्द व चिकाटीमुळेच त्याने हे यश संपादन केले.
- जगन्नाथ वीरकर, विक्रमचे वडील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikram Virkar IAS Officer Success Education Motivation