#ThursdayMotivation : निराधार कुटुंबासाठी गाव झाले एकत्र

रुपेश बुट्टे
Thursday, 6 February 2020

भाडे घेणार नाही...
ज्या जागेत कैलास गायकवाड केशकर्तनाचा व्यवसाय करीत होते, त्या जागेचे भाडे त्यांचा मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत घेणार नसल्याचे गोविंद घाटे यांनी या वेळी जाहीर केले. त्यामुळेही गायकवाड कुटुंबाला मोठी मदत झाली आहे.

आंबेठाण - कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंबेठाण (ता. खेड) येथील नाभिक समाजातील तरुण कार्यकर्ते कैलास किसन गायकवाड (वय ३६) यांचे २७ जानेवारीला पंढरपूर येथे जात असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मयत गायकवाड हे युवक मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे निराधार झालेल्या या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भविष्यात या कुटुंबाची फरफट होऊ नये या हेतूने या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, मुलांचे शिक्षण मार्गी लागावे यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन दशक्रिया विधीप्रसंगी गावचे उपसरपंच शांताराम चव्हाण यांनी केले आणि त्याला उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करीत पाठिंबा दिला.

या वेळी रोख स्वरूपात दोन लाख दोन हजार रुपये व नागरिकांनी जाहीर केलेली; परंतु तत्काळ जमा न झालेली जवळपास एक लाख रुपये मदत मिळाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी सभापती रामदास माटे, दत्तात्रेय भेगडे, विनोद म्हाळुगकर, तानाजी केंदळे, अमोल पानमंद, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच शांताराम चव्हाण, दत्तात्रय मांडेकर, चंद्रकांत चव्हाण, अमोल पानसरे यांच्यासह ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village became a place for the destitute family