‘वॉक ॲण्ड टॉक’ग्रुपने दिली इंगळीच्या भगिनीला उभारी

सुधाकर काशीद
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

वॉक अॅण्ड टॉकच्या सक्रिय भगिनी
सुवर्णा गांधी, दीपा वानखेडे, रेणू पाटील, गौरी घोलकर, कविता मोदी, फैजा मुल्ला, सुजाता जगताप, बिंदू भोला, रिता पाटील, निर्मला कृपलानी, गीतिका रजपूत, पंकजा पवार, विद्या हावळ, प्रांजली धामणे, सुप्रिया काळे, कांचन पाटील, प्रतिभा पाटील, सपना गद्रे, बीना डोली, मीनू अनवानी, अंजली पाटील, अपर्णा सरवडे.

कोल्हापूर - या आठ-दहा जणी रोज ताराबाई पार्कात ‘पीडब्ल्यूडी’च्या आवारात चालण्याच्या व्यायामाला जातात, अर्थात नुसतं चालणं त्यांना शक्‍यच नव्हतं, त्यामुळे त्यांची बडबडही सुरू असायची. त्यामुळे त्यांच्या ग्रुपचे नाव  कुणीतरी ‘वॉक ॲण्ड टॉक’ असे ठेवले. अर्थात, त्यांच्या ग्रुपला शोभेल असेच होते. नेहमीप्रमाणे त्या सगळ्या फिरायला आल्या. त्या वेळी चर्चा पुराची आणि मदत करायची होती, मग यांनीही बोलता-बोलता ठरवलं, की आपण पूरग्रस्तांना मदत करायची, पण त्यातल्या एकाला अशी मदत करायची, की त्याच्या आयुष्याची चिंता मिटवायची आणि त्यांनी तसेच केले. पुरात घराची पडझड झालेल्या बहिणीला त्यांनी एक दुभती म्हैस खरेदी करून दिली. आता पूर ओसरल्यानंतर काय, या चिंतेने ग्रासलेली ही भगिनी काल (ता. २४)पासून तिच्या म्हशीचे पाच लिटर दूध डेअरीला घालू लागली आहे. 

पुराने वेढलेल्या भागात काही दिवसांपासून मदतीचे कार्य वेगवेगळ्या पातळीवर सुरू झाले आहे. वॉक अॅण्ड टॉक ग्रुपच्या महिलाही मदतीसाठी इच्छुक होत्या. पण ठराविक तीच तीच मदत देण्यापेक्षा एखाद्या पूरग्रस्त कुटुंबाची पुन्हा पूर्ण उभारी देण्यावर त्यांचा भर होता. याच निमित्ताने त्या सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर व डॉ. अभया नरोटे यांच्या सोबत इंगळी (ता. हातकणंगले) येथे गेल्या. तेथे त्यांना मनीषा प्रकाश पाटील या महिलेचे घर पुरात उद्‌वस्त झाल्याचे व काही दिवसांपूर्वी म्हैस मेल्याची माहिती कळाली.

ही महिला मुलगा व मुलगी यांच्याबरोबर राहत होती. त्यामुळे त्यांनी ठरवलं या मनीषा पाटीलचे घर आपण पूर्ण करून द्यायचे. त्यांनी विचार केला त्यावेळी या महिलेला या क्षणी दुभती म्हैस घेऊन दिली तर तेथे अधिक चांगले होईल हे ध्यानात आले. त्यांनी त्या क्षणी पर्सचा अंदाज घेतला सगळ्यांकडे मिळून २२ हजार रुपये निघाले. म्हैस घ्यायला आणखी पैसे हवे होते, त्यांनी लगेच इकडून तिकडून उभे केले. 

गोकुळाष्टमीमुळे म्हशीचे नाव ‘राधा’
इंगळीच्या उत्तम पाटील यांची मदत घेऊन रांगोळीतून म्हैस खरेदी केली. गोकुळाष्टमी तोंडावर असल्याने तिचे नाव ‘राधा’ ठेवले. तिच्या वासराचे नाव राणी ठेवले. ही म्हैस दुभती आहे. ही म्हैस त्यांनी मनीषा  यांच्या दारात आणली. ती रोज चार ते पाच लिटर दूध देते. त्यामुळे घरखर्चाला मनीषा यांच्या हातात पैसे येऊ लागले या निमित्ताने ‘वॉक अंड टॉक’ ग्रुपनेही केवळ बोलत नाही तर मदतीचा खंबीर हात देऊ शकतो हे दाखवून दिले.

वॉक अॅण्ड टॉकच्या सक्रिय भगिनी
सुवर्णा गांधी, दीपा वानखेडे, रेणू पाटील, गौरी घोलकर, कविता मोदी, फैजा मुल्ला, सुजाता जगताप, बिंदू भोला, रिता पाटील, निर्मला कृपलानी, गीतिका रजपूत, पंकजा पवार, विद्या हावळ, प्रांजली धामणे, सुप्रिया काळे, कांचन पाटील, प्रतिभा पाटील, सपना गद्रे, बीना डोली, मीनू अनवानी, अंजली पाटील, अपर्णा सरवडे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walk and Talk Group help to Flood suffers special story