निवडलेल्या धान्यातून अनेकांना घास !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

दर रविवारी आम्ही एकत्र येतो. नीट केलेली धान्ये विकतो. १०, १५, २० रुपये किलोप्रमाणे ही धान्ये विकतो. अनेकजण ही धान्ये घेण्यासाठी येतात. पाखरे, कबुतरे, कोंबड्या, बकऱ्यांसाठी हे धान्य वापरले जाते. जी काही गरीब कुटुंबे आहेत, ती ही धान्ये खाण्यासाठी घेतात. या धान्यातून आम्हाला दीडशे, दोनशे रुपये मिळतात.
-विमल कांबळे

कोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील धान्य दुकानात विविध धान्ये, कडधान्ये विक्रीसाठी लगबग सुरू असते. गिऱ्हाइकांना ठरलेली धान्य अन्‌ कडधान्ये द्यायची असतात.  पोत्यातून, वजन काट्यावर ठेवताना धान्य, कडधान्ये जमिनीवर पडतात. हे करताना अनेक कडधान्ये एकत्रित होतात. 

त्यात अन्य कचराही राहतो. मग संध्याकाळी लोटून ही सर्व कडधान्ये बाजूला ठेवली जातात. ही कडधान्ये वाया जाऊ नयेत, म्हणून  विमल कांबळे, माया शिंगे, श्रीमती कमल हुलस्वार, सीताबाई जाधव अशी कडधान्ये गोळा करतात. मग या तिघी कडधान्ये एकत्रित स्वच्छ करतात.

चाळून त्यातील कचरा, खडे, बारीक प्लास्टिकचा कचरा, अन्य वस्तू बाजूला करतात. साफ केलेली ही कडधान्ये दर रविवारी लक्ष्मीपुरी येथील श्रमिक कार्यालयासमोरील रस्त्याकडेला विकायला बसतात. कित्येक वर्षे ही स्वच्छ केलेली कडधान्ये विक्री सुरू आहे. 

धान्य दुकानात विविध धान्ये, कडधान्ये ट्रक, टेम्पोतून उतरविली जातात. मग हा सर्व माल ग्रेडेशन प्रमाणे वेगवेगळा ठेवला जातो. जिथून हा माल येतो, तेव्हा ही धान्ये व्यवस्थित नीट करून ठेवावी लागतात. किलोच्या गोण्या तयार केल्या जातात. हे करताना काही वेळा माल खाली पडतो. श्रीमती कांबळे, श्रीमती हुलस्वार अन्‌ महिला विविध धान्य दुकानात कामाला आहेत. रविवारी त्यांना सुटी असते; पण सुटीचा वेळ वाया न घालविता दुकानातील राहिलेले धान्य, कडधान्ये एकत्रित आणून त्या स्वच्छ करतात. गेली ३० ते ३५ वर्षे ज्या दुकानांत त्या कामाला आहेत, तेथून संबंधित दुकानमालकाने सांगितल्यानंतरच राहिलेले धान्य आणून स्वच्छ करून विक्री केली जाते. गहू, तांदूळ, मटका, चवळी, तुर, मिरची बियाणे अशी अनेक कडधान्ये असतात. आज विक्रमनगर येथे धान्य बाजाराचे स्थलांतर झाल्याने अनेक महिलांचा रोजगार कमी झाला आहे. कित्येक महिला आज धुणी-भांडी करत संसार सांभाळत आहेत. 

दर रविवारी आम्ही एकत्र येतो. नीट केलेली धान्ये विकतो. १०, १५, २० रुपये किलोप्रमाणे ही धान्ये विकतो. अनेकजण ही धान्ये घेण्यासाठी येतात. पाखरे, कबुतरे, कोंबड्या, बकऱ्यांसाठी हे धान्य वापरले जाते. जी काही गरीब कुटुंबे आहेत, ती ही धान्ये खाण्यासाठी घेतात. या धान्यातून आम्हाला दीडशे, दोनशे रुपये मिळतात.
-विमल कांबळे

पूर्वी अशी धान्ये खूप मिळायची. मग ते एकत्रित आणून, निवडून ठेवायचो. यातून चार पैसे मिळायचे. आज महागाई खूप आहे. यातून आम्हाला पैसे मिळतात. पोट चालते, हे समाधान.
- कमल हुलस्वार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waste grains reused after cleaning