सांगली, मिरजेतील दोन हजार कुटुंबांकडून घरातच कचरा व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

सांगली - शहरांचा विस्तार होईल तसा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सांगली-मिरजेतील कचरा समडोळी व बेडग रस्त्यावरील डेपोत टाकला जातो; पण तेथेही त्रास होत असल्याने डेपो हटवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. ही समस्या जाणणारी सांगली, मिरजेतील दोन हजार कुटुंबे घरातच कचरा व्यवस्थापन करत आहेत. शहराच्या आरोग्यासाठी हा प्रयोग पथदर्शी ठरला आहे.

सांगली - शहरांचा विस्तार होईल तसा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सांगली-मिरजेतील कचरा समडोळी व बेडग रस्त्यावरील डेपोत टाकला जातो; पण तेथेही त्रास होत असल्याने डेपो हटवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. ही समस्या जाणणारी सांगली, मिरजेतील दोन हजार कुटुंबे घरातच कचरा व्यवस्थापन करत आहेत. शहराच्या आरोग्यासाठी हा प्रयोग पथदर्शी ठरला आहे.

घरातील ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत बनवायचे आणि त्यातून बगिचा फुलवायचा असा आनंददायी प्रयोग ही कुटुंबे राबवत आहेत. सांगलीतील सेंटर फॉर इनोव्हेशन संस्था पाठबळ देत आहे. याद्वारे दररोज सुमारे दोन ट्रक कचरा घरातच मुरत आहे. घंटागाड्यांच्या अनियमिततेतून ही संकल्पना जोर धरली. कचऱ्याची समस्या असलेल्या कुटुंबांपर्यंत इनोव्हेशन संस्था पोहोचली. आयुक्त व आरोग्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी मिरजेतील एक हजार कुटुंबे संस्थेकडे सोपवली. कुटुंबांना मातीच्या कुंड्या दिल्या. ओला व सुका कचरा वेगळा करण्याची माहिती दिली.

अशी होते प्रक्रिया 
ओला कचरा शक्‍य तितका बारीक करून कुंडीत टाकला जातो. कुजवण्यासाठी कल्चर फवारतात. काहीवेळा कुजलेले शेणखत किंवा झाडाच्या बुंध्याजवळची मातीही वापरतात. ओला कचरा जास्त असल्यास पाणी मारण्याची गरज नसते. पाच-सहा सदस्यांच्या कुटुंबात साधारणतः महिन्याभरात कुंडी भरते. ओल्या कचऱ्यातील पाणी कल्चरमधील किंवा शेणखतातील जीवाणू शोषून घेऊन विघटन करतात. पहिल्या दिवशीचा कचरा वीस दिवसांत सेंद्रिय खतात रूपांतरित होतो. 

सांगलीत गावभाग, विश्रामबाग, जुनी धामणी रस्ता, वारणाली तसेच मिरजेत ब्राह्मणपुरीतील कुटुंबे कचरा व्यवस्थापन करतात. सांगलीत काही अपार्टमेंटधारक सिमेंटच्या छोट्या हौदात सामुदायिक व्यवस्थापन करत आहेत. मिरजेत प्रयोग सुरू झाल्यानंतर ट्रकभर कचरा कमी झाल्याचे निष्कर्ष महापालिकेला मिळाले; घंटागाडी नियमित सुरू झाल्यानंतर मात्र कचरा पुन्हा घराबाहेर येऊ लागला. सांगलीत कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत आहे.  

घरातील शिल्लक अन्न व भाजीपाल्याच्या अवशेषापासून कंपोस्ट खत तयार करतो; झाडांना घालतो. सुका कचरा रिसायकलिंगसाठी तसेच प्लास्टिक व धातुचा कचरा भंगारात देतो. यातून शंभर टक्के कचरा व्यवस्थापन शक्‍य झाले आहे.
- जयवंत सावंत,
सावरकर कॉलनी

या प्रयोगाने कचऱ्याची समस्या काही प्रमाणात कमी करता आली. महापालिकेनेही नागरिकांना उत्तेजन द्यायला हवे. कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खतनिर्मिती हा चांगला मार्ग आहे.
- डॉ. सुहास खांबे,
सांगली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waste management at home in Sangli and Miraj