बंद बोअरवेलला पाणी आल्याने गावकरी सुखावले

पाणी भरताना झमकोली येथील विद्यार्थिनी.
पाणी भरताना झमकोली येथील विद्यार्थिनी.

नागपूर - नागपूरपासून ८० किमी लांब असलेल्या भिवापूर तालुक्‍यातील झमकोली  गावात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी बंद बोअरवेलला पाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यामुळे या गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. पाण्यासाठी कायम करावी लागणारी पायपीट बंद झाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे हास्य दिसू लागले आहे. 

पाणीटंचाई निवारणासाठी लाखो रुपये खर्च करून बोअरवेल खोदल्या. मात्र, ती बंद पडल्याने निधी वाया जातो. शिवाय पाण्याचाही प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर येतो. त्यामुळे टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. यावर तोडगा म्हणून बंद पडलेल्या बोअरवेल पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प अधिकाऱ्यांनी केला. प्रयत्न आणि परिश्रमानंतर प्रयोग यशस्वी झाला. बंद बोअरवेलमध्ये पाणी आले. त्याला जोड म्हणून नळ योजनाही सुरू झाली. पाण्यासाठी दूर जाणाऱ्या नागरिकांना चोवीस तास पाणी मिळू लागल्याने गावकरी आनंदित आहेत.

असा केला प्रयोग 
हा संपूर्ण भाग खाण क्षेत्राचा. गावात एक बंद बोअरवेल. बंद बोअरवेलच्या बाजूला १२० फूट पाइप टाकला. पाइपमध्ये त्याला छिद्र पाडण्यात आले. गिट्टी, गोटे, वाळूच्या मदतीने पाइप झाकण्यात आले. गावातील दोन घरे सिमेंट काँक्रिटची आहेत. त्या दोन छतावरील पाणी पाइपच्या खड्ड्यात सोडण्यात आले. यामुळे संपूर्ण पाइपमध्ये पाणी जमा झाले असून आजू-बाजूच्या परिसरातील पाणी झिरपले. त्यामुळे लगतच्या बंद बोअरमध्येही पाणी आले. तिथेच एक नळ योजनाही सुरू करण्यात आली. ही नळयोजना सोलरवर चालविण्यात येत आहे. सध्या एचपी मोटारच्या बाजूला दोन हजार लिटरची टॅंक लावण्यात आली आहे. सोलर सिस्टमच्या मदतीने टॅंक पाण्याने भरली जाते. यामुळे गावातील या नळाला चोवीस तास पाणी असते.

पाणी भरण्यासाठी शंभर मीटर दूर जावे लागत होते. शिवाय पाणीही कमी मिळत होते. यामुळे पाण्याचा मोठा प्रश्‍न होता. या नळामुळे आम्हाला केव्हाही पाणी घेता येते. पाण्याची समस्या दूर झाली.
- सुचिता अंबुलकर, गावकरी.

बंद बोअर आणि परिसराचा पूर्ण अभ्यास करण्यात आला. महिना, दीड महिन्याच्या अभ्यासानंतर हा प्रयोग करण्यात आला. याला तीन लाखांच्या जवळपास खर्च झाला. बंद बोअरवेल पुन्हा रिचार्ज झाला. पावसाळ्याचे पाणी वाया जाणार नसून जमिनीत जाईल. पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने गावाचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग इतर ठिकाणी राबविण्यास बंद बोअरवेल कामात येईल. यामुळे नव्याने बोअर करण्याची गरज पडणार नाही. मारोती बोटरे यांनी जागा दिल्याने हा प्रयोग यशस्वी करता आला.
- नीलेश मानकर, उपअभियंता, यांत्रिकी विभाग, जि. प.

एकच सरकारी विहीर आहे. गावातील सर्वच लोक येथून पाणी भरतात. नळयोजना आहे. मात्र, आठवड्यातून एक किंवा दोन दिवस पाणी मिळते. पाण्याचा मोठा प्रश्‍न होता. आता बोअरवेलला पाणी असून नळाच्या माध्यमातून चोवीस तास मिळते.
- कृष्णा अंबुलकर, गावकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com