जोतिबा डोंगरात 13 जणांची ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिम

सुधाकर काशीद
बुधवार, 10 जुलै 2019

कोल्हापूर - जोतिबाच्या डोंगरावर ते दर रविवारी सकाळी ७ ते ११ पर्यंत चर खोदत होते. जाता-येता काही लोक चौकशी करत होते; पण पुढे जात होते. असे चर तुम्ही दहा-पंधरा जण किती दिवस खोदणार? त्यात किती पाणी साठणार? त्यामुळे अशी किती झाडे जगणार? असेही तिरकसपणे विचारणारे त्यात काही जण होते; पण त्याकडे लक्ष न देता दोन-तीन वर्षे हे १३ जण दर रविवारी आपले काम करतच होते.

कोल्हापूर - जोतिबाच्या डोंगरावर ते दर रविवारी सकाळी ७ ते ११ पर्यंत चर खोदत होते. जाता-येता काही लोक चौकशी करत होते; पण पुढे जात होते. असे चर तुम्ही दहा-पंधरा जण किती दिवस खोदणार? त्यात किती पाणी साठणार? त्यामुळे अशी किती झाडे जगणार? असेही तिरकसपणे विचारणारे त्यात काही जण होते; पण त्याकडे लक्ष न देता दोन-तीन वर्षे हे १३ जण दर रविवारी आपले काम करतच होते. आणि काही दिवसांत त्यांच्या या कामाचे सार्थक झाले. त्यांनी जोतिबा डोंगराच्या उतारावर खोदलेल्या साधारण पन्नास-साठ फुटांच्या विस्तीर्ण रुंदीच्या तीन चरांत पावसाचे मस्त पाणी साठले आहे. दिवसभरात रोज हे पाणी डोंगरात मुरते आहे. आणि रात्री पाऊस झाला, की पुन्हा भरत आहे. आपण आपल्या ताकदीने एवढे तरी पाणी मुरवू शकलो, याचे एक वेगळे समाधान त्यांनी मिळवले आहे. 

कोल्हापुरातले अनेकजण दर रविवारी पहाटे कोल्हापूर ते जोतिबा किंवा कुशिरे ते जोतिबा चालत जातात. व्यायाम आणि जोतिबावरील श्रद्धा अशा दोन्ही बाजू त्याला असतात. त्याच पद्धतीने हे तेरा जण दर रविवारी कुशिरे ते जोतिबा चालत जात होते. जाण्याची वाट डोंगर व दगडधोंड्यांची. या वाटेने ते जायचे; पण हा सारा डोंगर उघडा बोडका पाहून ते अस्वस्थ व्हायचे. त्यांनी एक दिवस चर्चा करता करता आपण डोंगरावरच वृक्षारोपण करायचे ठरवले. वृक्षारोपण होईल; पण पुढे त्यासाठी पाण्याचे काय, या प्रश्‍नावर वृक्षारोपण थांबले. मग त्यांनी डोंगरावर पाणी मुरविण्यासाठी स्वतः श्रमदान करायचे ठरवले व दर रविवारी ते तीन-चार तास उतारावर चर खोदू लागले. 

यावर्षी त्या चरांना बऱ्यापैकी आकार आला. काही दिवसांत पाऊसही चांगला झाला आणि हे तिन्ही चर भरले. त्यापैकी एका चराचे विस्तारीकरण वनविभागाने केले. आता हे चर पाण्याने मस्त भरले आहेत. पाणी मुरत आहे. चर पुन्हा पाण्याने भरत आहेत. हे तेरा जण आपण केलेल्या कामाचे जरातरी सार्थक झाले म्हणून समाधानी आहेत. ज्या जोतिबावर आपली श्रद्धा आहे, त्या जोतिबाचा डोंगर थोडा फार तरी हिरवागार ठेवण्यासाठी आपण काहीतरी करू शकलो याचा त्यांना आनंद आहे. आणि केवळ तीन चर खोदून न थांबता पावसाळ्यानंतर पुन्हा दर रविवारी तीन-चार तास घाम गाळण्याचा त्यांचा निर्धार आणखी टवटवीत झाला आहे. 

शिलेदार असे...
नितीन देवेकर, गजानन गराडे, मोहन पाटील, अमोल शिंदे, अभिजित फल्ले, सतीश वरगे, विश्‍वजित पाटील, भरज नेजकर, सत्यजित जाधव, राम माने, योगेंद्र घाटगे, नीलेश पाटील, केतन पाटील, विनायक कुंभार, सागर कुंभार, रोहित कडणे, विजय वाले, ओंकार पाटील, ऋतुराज पाटील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water conservation campaign on Jotiba Dongar