#WednesdayMotivation: अवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील शेती

vijay-kopnar
vijay-kopnar

नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील विजय व विशाल हे उच्चशिक्षित कोपनर बंधू दरवर्षी मक्याचे चांगले उत्पादन घेण्यामध्ये कुशल झाले आहेत. यंदाही सतर्क राहून दोन फवारण्या वेळीच करून त्यांनी अमेरिकन लष्करी अळीपासून आपले पीक वाचवले आहे. विजय यांनी नोकरी नाकारून शेती करण्यास प्राधान्य देत माळरानावरील पडीक जमीन विकसित केली. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पंचवीस वर्षांपासून दुग्ध व्यवसायही जोपासला आहे. चांगल्या शेती उत्पादनातूनच त्यांनी संसार सावरला आहे. 

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. तालुक्यातील निंबे येथील विजय व विशाल या कोपनर बंधूंची सुमारे ११ एकर जमीन आहे. विजय यांचे बी.एस्सी. बीएड पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे धाकटे बंधू विशाल ‘एमफार्म’ असून ते मांडवगण फराटा (ता. शिरूर घोडनदी) येथे खासगी महाविद्यालयात नोकरी करतात. विजय यांनी मात्र नोकरी न करता शेतीतच प्रगती करण्याचा निर्णय घेतला. त्यांची चार एकर जमीन माळरानाची आणि पडीक होती. उपलब्ध असलेल्या शेतीत वेगवेगळे उत्पादन घेत आर्थिक स्थिती त्यांनी सावरली. त्यातून तीन वर्षांपूर्वी ही पडीक जमीन विकसित केली. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केले. त्यात उत्पादन घेणे शक्य झाल्यानंतर कुटूंबाच्या आर्थिक उत्पादनात भर पडू लागली. याच शेतीतील उत्पन्नाच्या जोरावर पाणी उपलब्धतेसाठी ६० फूट खोलीची विहीर खोदली.  शेताशेजारूनच कुकडीचा कालवा जातो. त्यामुळे कालव्याला पाणी सुटले की त्याचा विहिरीला निश्चित फायदा होतो. 

उत्पादनात केली वाढ
कोपनर परिवार पूर्वी बाजरी, ज्वारी, तूर अशी पिके घेत. वडील पंडीत यांच्या काळापासून मका हे पारंपरिक पीक होते. अलीकडील वर्षांत विजय यांच्यावर ही जबाबदारी आहे. त्यांनी एकरी उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. खत व पाणी व्यवस्थापनात बदल केला. शेणखतासह रासायनिक खतांचा वापर संतुलित केला. पाऊस व हवामान ठीकठाक राहिले, तर मक्याचे एकरी ३० व कमाल ३५ क्विंटल पर्यंत उत्पादन होते असे विजय सांगतात. मागील वर्षी पुरेशा पावसाअभावी २८ क्विंटलच उत्पादन घेता आले. 

यंदा अळीपासून वाचवले पीक 
दरवर्षी चार एकरांपुढेच असलेले खरिपातील मका पीक यंदा नऊ एकरांत होते. लागवडीवेळी एकरी १० किलो झिंक सल्फेट, पाच ५ टन शेणखताचा वापर केला. जमीन भुसभुशीत ठेवली. पाणी धारण क्षमता  चांगली राहिली. कर्जत तालुक्याच्या दक्षिण भागात अलीकडील काळात मक्याचे क्षेत्र वाढले आहे. यंदा मात्र बहुतांश भागात त्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पीक वाया गेले. विजय यांनी मात्र लागवडीपासूनच जागरूक राहून योग्य प्रकारे व्यवस्थापन ठेवले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी दुसऱ्या शिफारसीत कीटकनाशकाची फवारणी त्यांनी केली. द्रावण पोंग्यात पडेल असे नियोजन केले. वेळीच दाखवलेल्या या सतर्कतेमुळे प्रादुर्भाव रोखण्याला मदत झाली. विजय यांच्या मार्गदर्शनामुळे गावातील काही शेतकऱ्यांनाही प्रादुर्भाव रोखणे शक्य झाले.   

मजुरीचा खर्च केला कमी कोपनर कुटूंबात पाच सदस्य आहेत. त्यातील चार जण शेतात राबतात. सकाळी सहा वाजता त्यांच्या कामास सुरुवात होते. अधिक गरजेच्या वेळी नातेवाईक व परिसरातील सहकारी कामांसाठी येतात. मग कोपनर कुटूंबातील सदस्यही त्यांच्याकडे कामांस जातात. साहजिकच मजुरांची गरज कमी झाल्याने वर्षाला तीस ते चाळीस हजार रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे.  

दुग्ध व्यवसाय जोपासला
विजय यांच्या वडिलांनी पंचवीस वर्षांपासून दुग्ध व्यवसाय सातत्याने जोपासला आहे. सध्या त्यांच्याकडे चार संकरीत गाई व म्हैस आहेत. सध्या दररोज पंचवीस लिटर दूध डेअरीस घातले जात आहे. विशेष  म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती साधारण असताना दुग्ध व्यवसाच्या जोरावरच दोघा बंधूंचे उच्चशिक्षण झाले. या व्यवसायातूनही कुटूंबाला आर्थिक हातभार लागतो. जनावरांसाठी मक्यापासून मुरघास तयार करण्यात येतो. त्यामुळे चाऱ्यावरील खर्च कमी केला आहे.  

चांगले शिक्षण घेतल्यानंतरही मी नोकरी करण्याऐवजी शेती कररून त्यातच प्रगती करण्याचा निर्णय घेतला. पडीक जमीन विकसित केली. मका, कांदा पिके घेत उत्पादनात वाढ केली. यंदा व्यवस्थापनावर अधिक लक्ष दिल्यामुळे मक्याचे पीक लष्करी अळीपासून वाचवता आले. ’
   विजय पंडीत कोपनर, ९९७०६३५४३४

कांदा उत्पादनावर भर : मक्यानंतर कांदा घेण्यात येतो. त्याची एकरी उत्पादकता १० ते १३ टनांपर्यंत जोपासली आहे. तीन वर्षांपूर्वी अडीच एकरांत २१ टन उत्पादन, दोन वर्षांपूर्वी चार एकरांवर ५२ टन तर गेल्यावर्षी अडीच एकरांत २८ टन उत्पादन घेतले. गेल्यावर्षी दुष्काळाचा फटका सहन करावा लागला. मात्र शेणखताच्या वापरातून कांद्याचे एकरी उत्पादन वाढवण्यास मदत झाली आहे.व्यापारी जागेवर येऊन मालाची खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक, अडत खर्चात बचत झाली आहे. कांद्याने कोपनर यांना बऱ्यापैकी आधार दिला आहे. यंदा एक एकरांत लागवड केली असून अजून चार एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. 

चांगल्या  उत्पादनाची आशा
आता प्लॉट संपला आहे. यंदा संकरीत वाण बदलले आहे. त्याचे एकरी ३५ ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादन विजय यांना अपेक्षित आहे. जानेवारीच्या काळात त्याची विक्री होईल. या भागातील अनेक शेतकरी एकत्रपणे येथून जवळ असलेल्या एका मका प्रक्रिया कंपनीला विक्री करतात. त्यामुळे बाजारपेठेची तशी चिंता नाही. सध्या क्विंटलला १८०० ते २२०० रुपये दर सुरू आहे. मागील वर्षी १७०० रुपये दर मिळाला होता. गरजेनुसार बाजारसमितीतही विक्री होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com