कामगारांच्या मुलांसाठी खुली शिक्षणाची दारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 जानेवारी 2019

पिरंगुट - मिळेल ते काम करून पोट भरण्यासाठी आपला प्रांत सोडून हजारो स्थलांतरित कामगार पिरंगुट (ता. मुळशी) येथील औद्योगिक वसाहतीत येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्या मुलांसाठी राष्ट्रीय सर्वांगीण विकास संस्थेने पुढाकार घेऊन २०११ पासून बाल विद्या मंदिर या नावाने पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. या शाळेत मुलांना सेमी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. सध्या या शाळेत एकूण ३० मुले शिक्षण घेत आहेत. 

पिरंगुट - मिळेल ते काम करून पोट भरण्यासाठी आपला प्रांत सोडून हजारो स्थलांतरित कामगार पिरंगुट (ता. मुळशी) येथील औद्योगिक वसाहतीत येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्या मुलांसाठी राष्ट्रीय सर्वांगीण विकास संस्थेने पुढाकार घेऊन २०११ पासून बाल विद्या मंदिर या नावाने पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. या शाळेत मुलांना सेमी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. सध्या या शाळेत एकूण ३० मुले शिक्षण घेत आहेत. 

कायमस्वरूपी काम मिळणे कठीण असल्याने रोजंदारीवर मिळणारे काम करून कुटुंबाची गुजराण करताना कामगारांची ओढाताण होते. दररोजच्या कामाच्या मोबदल्यात मिळणारा पगारही तुटपुंजा असल्याने मूलभूत गरजा भागविताना मुलांना चांगल्या शाळेत दाखल करून शिकविणे तसे कठीणच.

पिरंगुट शहरातील भैरवनाथनगर हा परिसर नवीन कंपन्या व गृहप्रकल्पांमुळे विस्तारत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार येऊन स्थायिक झाले आहेत. सरकारच्या अंगणवाड्या आणि बालवाड्या या परिसरापासून दूर असल्याने चिमुकल्यांना सोडणे पालकांसाठी जिकिरीचे होते. याची दखल घेऊन राष्ट्रीय सर्वांगीण विकास संस्थेने मुलांना शिक्षणाची दारे खुली केली आहेत.

शाळेत दाखल झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या प्रांतातून आलेले असल्याने त्यांची भाषा, राहणीमान, सवयी सारे काही वेगवेगळे असते. सुरवातीला त्यांना मराठी भाषा बोलायला व समजायला कठीण जाते; परंतु शाळेच्या अभ्यासक्रमातून, तसेच विविध उपक्रमांतून हे विद्यार्थी इतर मराठी भाषक विद्यार्थ्यांच्या सहवासात अनेक गोष्टी वेगाने आत्मसात करतात. 

या बाल विद्या मंदिरासाठी हॉटेल श्रेयसचे मालक चिंतामणी चितळे यांनी जागा मोफत उपलब्ध करून दिली आहे. आवश्‍यक असलेल्या भौतिक सोयी-सुविधाही त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आवश्‍यक असलेले आदर्श शैक्षणिक वातावरण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो. शाळेत दाखल झालेल्या मुलांबरोबरच त्यांच्या पालकांकरिताही विविध स्पर्धा, शिबिरे, समुपदेशन यांसारखे उपक्रम राबविले जातात.

आदिवासी मुलांसाठी अभ्यासिका - धोत्ये
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांतील मुले आर्थिक कारणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता संस्थेने पुढाकार घेऊन बाल विद्या मंदिर हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय संस्थेच्या माध्यमाने सुतारवाडी, अंबडवेट, गडदावणे येथील आदिवासी मुलांकरिताही शाळेच्या नंतरच्या वेळी तेथील वस्त्यांवर जाऊन अभ्यासिकाही चालविल्या जातात. समाजातील दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यामुळेच हे सर्व उपक्रम चालविणे शक्‍य होत आहे, असे संस्थेच्या संचालक समितीच्या संगीता धोत्ये यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker Child Education Motivation