चिपळुणातील गणेशोत्सवाच्या तयारीला वेग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 August 2017

बाजारपेठेसह मूर्ती कारखान्यांत लगबग - चाकरमान्यांना वेध कोकणाचे

चिपळूण - गणरायाच्या आगमनाला तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शहरात उत्सवाच्या आगमनाचे पडघम वाजू लागले आहेत. देव घडविणाऱ्या कुंभारवाड्यातील लगबग, ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे मांडलेले स्टॉल्स, मंडळांची मंडप उभारणी, विजेच्या आकर्षक माळा, मखरं, मंदिरांच्या लहान कटआउट्‌सची मांडणी या तयारीने वातावरणात उत्साहाचे रंग भरू लागले आहेत.

गणेशोत्सव म्हणजे साक्षात देवानेच आपल्या घरी येणे. गौरी-गणपतीच्या या दिवसांत वर्षभरातील सगळे ताणतणाव, दु:ख, विवंचना विसरून प्रत्येक जण आनंदोत्सव साजरा करतो. गणेशोत्सव २५ तारखेपासून सुरू होत आहे. घरोघरी उत्सवाच्या प्राथमिक तयारीची चर्चा सुरू आहे. कुंभारगल्लीत तयार झालेल्या आकर्षक गणेशमूर्ती भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. अद्याप तयार नसलेल्या कच्च्या गणेशमूर्तींना रंगविण्याच्या कामाला वेग आहे. दुकानात मांडलेल्या तयार मूर्ती आणि रंगकाम सुरू असलेल्या मूर्ती मन आकर्षून घेतात.

डॉल्बीला उत्तम आणि पारंपरिक पर्याय म्हणून तीन-चार वर्षांपासून ढोल-ताशांची क्रेझ वाढली आहे. पुण्याच्या पद्धतीला कोकणी परंपरेचा तडका देत तयार झालेल्या या ढोल-ताशा पथकांकडून जोरदार सराव सुरू आहे.

याशिवाय बॅंड-बेंजो पथकांकडूनही वाद्यांवर गाण्यांचा सराव सुरू आहे. गणेश मंडळांकडून वर्गणी स्वीकारणे सुरू आहे. ठरलेल्या जागेवर मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. गणेशाच्या सजावटीसाठी लागणारी मखरं, मंदिराच्या आकारातील डिजिटल कटआउट्‌स आणि विजेच्या आकर्षक माळा दुकानांबाहेर सजविण्यात येत आहेत. सावर्डे, अलोरे, खेर्डी, पिंपळी, येथील बाजारपेठांमध्ये या सजावटीच्या साहित्याची मांडणी सुरू झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun konkan news ganeshotsav preparation fast