सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत केले.

सौ. राणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, आम्ही कोकणातीलच. कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रिक्षातून गावी येण्याचे ठरवले. मुंबई-मालवण सुमारे सहाशे किलोमीटरचे अंतर पार करत असताना महामार्गातील खड्ड्यांनी रिक्षा चालवणे नकोसे वाटले. बरोबर पती आणि मुलगीला घेऊन यापूर्वी टॅक्सी घेऊन येत होते. पण यंदा रिक्षाने गावी आले. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, आनंद आहे, पण खड्ड्यांचे काय? महामार्गावर अंतराअंतरावर स्वच्छतागृह हवीत. त्याची मोठी उणीव जाणवते. पेट्रोल, डिझेल दरात वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने संसार चालवणे मेटाकुटीला आले आहे. रिक्षा हा श्वास आणि ध्यास आहे, पण इंधन दरवाढीमुळे जीवनात राम उरला नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. नोकरी नाही म्हणून कोणी गप्प न बसता हिमतीने महिलांनी बाहेर पडले पाहिजे. मिळेल ते काम केल्यास जगाच्या बाजारात महिलेचे अस्तित्व नक्कीच समजेल.