अनंत चतुर्दशीला सुरू होणार मुरडेतील गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सर्वांचा सहभाग..
खेडपासून सात किमी अंतरावर असलेल्या मुरडे-आंबेडेवाडी येथे हा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा केला जातो. वाडीतील सर्व तरुणांसह अाबालवृद्ध या उत्सवाची तयारी करतात. प्रत्येकजण मुंबई-पुण्यातून या उत्सवासाठी अनंत चतुदर्शीच्या आदल्या दिवशीच या ठिकाणी दाखल होतात.

खेड - तालुक्‍यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना मुरडे-आंबेडेवाडी मात्र अनंत चतुर्दशीला गणपतीचे आगमन होते. एका लहानशा घटनेने सुरू झालेला हा गणेशोत्सव विजयादशमीपर्यंत सुरू असतो. गेली वीस वर्षे हा उत्सव सुरू आहे.

नवसाला पावणाऱ्या या बाप्पांची पंचक्रोशीसह पुण्या-मुंबईत ख्याती आहे. १९९७ मध्ये मुरडे आंबेडेवाडी येथे अनंत रामा आंबेडे यांच्या घराच्या अंगणात काही मुले खेळत होती. खेळता- खेळता काहींनी मातीचा किल्ला बनविण्यासाठी माती आणली. किल्ला बनविताना या मातीतून या मुलांच्या हातून गणरायच साकारले, परंतु त्या लहानग्यांना त्या गणरायाला रंग देता येत नव्हता. त्यामुळे काही मुलांनी वाडीतच असलेल्या सहदेव आंबेडे यांच्या गणेशमूर्ती शाळेत धाव घेतली व त्यांना ही गोष्ट सांगितली. त्या वेळी आंबेडे यांच्या मातोश्री गंगाबाई काशिराम आंबेडे यांनी मुलांना मुर्तीशाळेतील एक गणरायाची मुर्ती भेट दिली. तो दिवस अनंत चतुदर्शीचा होता. त्यानंतर मात्र त्या सर्व मुलांनी अनंत रामा आंबेडे यांच्या अंगणात ही मूर्ती विराजमान करून गणेशोत्सवास सुरवात केली. त्यानंतर अनेक वर्षे हा गणेशोत्सव आंबेडे यांच्या अंगणात सुरू होता; परंतु २००८ मध्ये आंबेडे यांच्या घरासमोर गणपतीचे मंदिर बांधण्यात आले. त्यामुळे या मंदिरात सद्य:स्थितीत हा गणेशोत्सव सुरू आहे. संपूर्ण वाडीमध्ये २४ घरे असून, बहुतांश लोक हे कामानिमित्त मुंबई, पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या उत्सवासाठी कोणत्याही प्रकारची देणगी किंवा वर्गणी काढली जात नाही. सद्य:स्थितीत अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती आणल्या जातात; परंतु या ठिकाणी अद्यापही शाडूच्या मातीची मूर्ती बसविली जाते. त्या मूर्तीवर आजही नैसर्गिक रंगच दिले जातात. वाडीतील एका मूर्तीशाळेत ही मूर्ती साकारली जाते. त्यासाठी गावातील हेच मित्रमंडळी एकत्र येत ही मूर्ती बनवितात. या मूर्तीचे विजयादशमीच्या दिवशी वाजत-गाजत या बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी हा उत्सव ५ सप्टेंबरला सुरू होणार असून, ३० सप्टेंबरला उत्सवाची सांगता होणार आहे.

 ‘‘या गणरायामुळे आमच्या वाडीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांची या बाप्पावर श्रद्धा असून नवसाला पावणारा हाकेला धावणारा असा आमच्या बाप्पांचा नावलौकिक आहे.’’
- दीपक रेवाळे, अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan news ganesh festival 2017 konkan ganesh ustav