esakal | भारतीय कबड्डी संघात खेळणार कोकणचा शुभम शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

shubham shinde the kabaddi player from ratnagiri selected in indian kabaddi team

दसपटीचा खेळाडू; चिपळूणच्या क्रीडा क्षेत्रात मिळवला नावलौकिक

भारतीय कबड्डी संघात खेळणार कोकणचा शुभम शिंदे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्‍यातील दसपटी येथील कोळकेवाडी वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे याची भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे. यामुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करून निवड समितीचे लक्ष वेधले होते.

हेही वाचा - चिंता कर्जाचे हप्ते भरण्याची  : आशा पर्यटनाला दिवाळी बूस्टरची

महाराष्ट्र राज्य संघातून खेळताना अनेक वेळा त्याने चमकदार कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे. भारतीय प्राथमिक संघात शुभम शिंदे व मुंबई शहर कबड्डी संघाचा पंकज मोहिते या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड झाली आहे. शुभम शिंदेंची प्रो कबड्डी पर्व ६ साठी पुणेरी पलटण संघात निवड झाली होती. गेल्या काही वर्षांमध्ये शुभमने रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धांमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित केला आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेत ही वाघजाई कोळकेवाडी संघाचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा -  कोकणात औषधांच्या नावाखाली लूट ; रेमडिसिव्हीरसाठी मोजावे लागतात सत्तर हजार रुपये 

सेंट्रल बॅंक व्यावसायिक कबड्डी संघातही त्याची निवड झाली होती. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने त्याने एअर इंडिया संघात स्थान मिळवले व पहिल्याच स्पर्धेत स्पर्धेतील सर्वोत्तम पकडपटू होण्याचा मान मिळवला. सलग तीनवेळा महाराष्ट्र कुमार गट संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले आहे. २०१६ मध्ये त्याने महाराष्ट्र कुमार गट संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.

दृष्टिक्षेपात

राज्य संघातून चमकदार कामगिरी 
जिल्ह्यातील कबड्डीत एकछत्री अंमल
राज्यस्तरीय स्पर्धेत वाघजाई कोळकेवाडीचा ठसा 
शैलीदार, आक्रमक चढाया, बोनस टिपण्याची चपळाई

संपादन - स्नेहल कदम