विद्यार्थ्यांनो दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

दहावीच्या लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत.

सिंधुदुर्गनगरी : फेब्रुवारी-मार्च दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या, एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात येत आहे. या परीक्षांचे वेळापत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून जाहीर केले आहे. 

हेही वाचा - सिंधुदुर्गात होणार नवीन १८ हवामान केंद्रांची उभारणी -

दहावीच्या लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. बारावी सर्वसाधारण व द्विलक्षी विषय, लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत तर बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर व बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या WWW. Mahahsscboard.in या संकेतस्थळावर दिनांक २० पासून उपलब्ध आहे. 

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी.

हेही वाचा - काळा तांदुळ फुलवणार पैशांचा मळा -

अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खाजगी छपाई केलेले, व्हॉट्‌सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. याची विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी केले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 th and 12 th supplementary exam date declared in sindhudurg information available on website