काजूवरील एसजीएसटीचा 100 टक्के परतावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

वेंगुर्ला - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात आज झालेल्या काजू उद्योजकांच्या बैठकीमध्ये जीएसटीचा एसजीएसटी 100 टक्के परतावा जीएसटी लागू झाल्यापासून तसेच काजू उद्योजकांनी बॅंकमधून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर पाच टक्के सबसिडी असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे काजू उद्योजक व काजू बी शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. 

अर्थ व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी सचिव, उद्योग सचिव, अर्थसचिव, भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपिन वरसकर, काणेकर आदी या बैठकीला उपस्थित होते.

अर्थमंत्र्यांच्या दालनात दुपारी साडेतीनच्या दरम्यान बैठक झाली. जीएसटीमध्ये एसजीएसटी 100 टक्के परतावा जीएसटी सुरू झाल्यापासून मिळेल व ज्या काजू उद्योजकांनी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याज रकमेवर (इंटरेस्ट सबसिडी) पाच टक्के सवलत त्वरित जाहीर करण्यात आली. त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्व सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच अर्थसंकल्पावेळी जाहीर केलेल्या 100 कोटी रुपयांची तरतूद केलेल्या निधीपैकी काही निधी काजू लागवडीला देण्यात येणार आहे. 

गतवर्षी काजू उद्योगाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काजू उद्योजकांनी शतक महोत्सव साजरा केला होता. या कार्यक्रमास आलेले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे काजू उद्योजक, उत्पादक शेतकरी यांनी विविध समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यावेळी या सर्वांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती.

संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर व पदाधिकाऱ्यांनी या तिन्ही मंत्र्यांकडे मागण्यांबाबतचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला या बैठकीतून यश आले. श्री. मुनगंटीवार व केसरकर यांनी काजू उद्योजक व काजू बी उत्पादक शेतकरी यांनी दिलेल्या न्यायाबद्दल सुरेश बोवलेकर यांनी असोसिएशनतर्फे व काजू उत्पादक शेतकऱ्यांतर्फे या दोन्ही मंत्र्यांचे आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 percent SGST returns on cashew nuts