पिंगुळीत कोरोना रुग्णांची संख्या 12 वर; यासाठी घेतला आहे हा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पिंगुळीत रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली. आज तीन महीने पिंगुळी पूर्ण संयमाने कोरोनाशी लढत आहे. गावातील व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पदाधिकारी कर्मचारी आपल्या सोबत इतरांच्याही परिवारांची योग्य प्रकारे काळजी घेत माणूसकी जपत आहे.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पिंगुळी गावात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. होणाऱ्या गर्दीसाठी उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक केले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

पिंगुळीत रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली. आज तीन महीने पिंगुळी पूर्ण संयमाने कोरोनाशी लढत आहे. गावातील व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पदाधिकारी कर्मचारी आपल्या सोबत इतरांच्याही परिवारांची योग्य प्रकारे काळजी घेत माणूसकी जपत आहे. परमपूज्य संत राऊळ महाराज ट्रस्ट व परमपूज्य अण्णा महाराज ट्रस्ट यांच्यावतीने पूर्ण गांव निर्जंतुक करण्यासाठी घरोघरी फवारणी करण्यात आली; पण आजची परिस्थिती थोडी वेगळी झाली.

गावातील गोंधळपुर या एकाच भागात पहिल्यांदा एक आणि आता एकूण रुग्ण 12 रुग्ण कोरोना संसर्गित मिळालेत. गावातील प्रत्येक व्यापारी स्वतःची काळजी घेत असला तरीही आज जोखीम जरा जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःसोबत इतरांच्या जीवाची काळजी घेणे आवश्‍यक आहे. मास्क, सोशल डिस्टनसिंग सारखे नियम आपला धोका बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतात. त्यामुळे त्याचा वापर बंधनकारक आहे. कोरोना परिस्थितीबाबतीत ग्रामपंचायत सुरुवातीपासून सतर्क आहे. 

वाढती संख्या लक्षात घेता सरपंच निर्मला पालकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. पिंगुळी बॅंक परिसरातील गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी नियमाला अनुसरून बॅंक कामकाज बंद ठेवावे, असे निवेदन आज जिल्हा परिषद अध्यक्ष नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच निर्मला पालकर, विकास कुडाळकर यांनी शाखाधिकारी यांना देऊन सहकार्य करण्याची मागणी केली. 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई 
या सभेत सोमवार, मंगळवार यादिवशी गावातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जी व्यक्ती मास्कचा वापर करीत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. गावातील दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंतच उघडी राहणार आहेत. त्यानंतर दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 Corona Patient In Pinguli Sindhudurg Marathi News