esakal | धक्कादायक ! रत्नागिरीत वीसपेक्षा कमी पटाच्या 1,437 शाळा 
sakal

बोलून बातमी शोधा

1437 Schools Have Less Than Twenty Students In Ratnagiri Marathi News

धक्कादायक ! रत्नागिरीत वीसपेक्षा कमी पटाच्या 1,437 शाळा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा पाया असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची घटती पटसंख्या चिंतेची बाब बनलेली आहे. जिल्ह्यातील 2688 शाळांपैकी 1437 शाळा 1 ते 20 पटाच्या आहेत. त्यातील चारशे शाळा दहापेक्षा कमी पटांच्या आहेत. शासनाच्या निकषानुसार त्या शाळांवर भविष्यात गंडांतर येण्याची शक्‍यता आहे.गेल्या 4 वर्षात 159 शाळा बंद पडल्या आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या सोळा लाखापर्यंत आहे. गेली कित्येक वर्षे येथील तरुण नोकरीसाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करतो. नोकरी करत तेथेच वास्तव्य करत आहे. देशाची लोकसंख्या वाढत असताना मात्र रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद आहे. स्थलांतर आणि कुटुंब नियोजन ही दोन महत्त्वाची कारणे अभ्यासकांकडून दिली जात आहेत. त्याचा परिणाम गावा - गावातील जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पालकांमध्येही इंग्रजी शिक्षणासह खासगी शाळांचे प्रचंड आकर्षण आहे. आर्थिक भुर्दंड बसला तरीही इंग्रजी शाळांमधील प्रवेशासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालक मुलांचा शिक्षणाचा श्रीगणेशा इंग्रजी शाळांमधून करत आहेत.

शासनाकडूनही इंग्रजी शाळांना प्रमाणापेक्षा अधिक मान्यता दिल्यामुळे गावाजवळ एखादी शैक्षणिक संस्था शाळा सुरु करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अशाप्रकारे शेकडो शाळा सुरु झालेल्या आहेत. तसेच वाड्यांमधील मुलांना जवळच्या शहरी भागात शिक्षणासाठी येण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्थांकडून व्यवस्था केली जाते. 

विविध कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटावर परिणाम होत आहे. दरवर्षी पाच ते सहा हजाराने पट घसरत आहे. यंदाही तीच परिस्थिती पहायला मिळते. 0 ते 20 पटांच्या शाळांची संख्या 1,437 पर्यंत पोचली आहे. गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग जीवतोड प्रयत्न करत आहे. शिक्षणामधील पर्यवेक्षकी यंत्रणा, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी हे शैक्षणिक कामांपासून दूर जात असून त्यांच्यावर अन्य जबाबदाऱ्या वाढत आहेत. त्याचा परिणाम नियमित कामकाजावर होऊ लागला आहे.

मराठी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे पहिली ते सातवीच्या वर्गांना वर्ग दोनच शिक्षक असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. पाचवी ते सातवीसाठीचे शिक्षण घेताना गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांतून मिळणारे तांत्रिक शिक्षण देणारे शिक्षक अल्प आहेत. परिणामी पालकांचाच कल दिवसेंदिवस बदलू लागला आहे. 

पट वाढविण्यासाठी शाळांमधील शिक्षकांचे इंग्रजी बोलण्याचे अभ्यासक्रम घेतले जात आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेतील मेरीट वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने कक्ष स्थापन केला आहे. तसेच वर्षभरात मुलांसाठी वैद्यकीय खर्च उचलण्याची तयारी केली आहे. 
- एस. जे. मुरकुटे, उशिक्षणाधिकारी 

तालुक्‍यानुसार शाळेचा पट असा 

तालुका................. पट 
चिपळूण.............. 202 
दापोली............... 161 
गुहागर................ 93 
खेड................. 231 
लांजा............. 120 
मंडणगड......... 94 
राजापूर.........192 
रत्नागिरी......137 
संगमेश्‍वर..... 207 

गेल्या 4 वर्षात बंद पडलेल्या शाळा 

वर्ष बंद ...........शाळा 
2016-17........ 22 
2017-18.......109 
2018-19........ 02 
2019-20........26