सिंधुदुर्गात पंधरा गावे इकोसेन्सिटिव्ह 

तुषार सावंत
Saturday, 24 October 2020

अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सिमेपासून 10 किलो मीटरपर्यंत संवेदनक्षेत्र राहील, अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे लोकांवर बंधने आली

कणकवली (सिंधुदुर्ग) - राधानगरी अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येणारी सिंधुदुर्गातील पंधरा गावे इकोसेन्सिटीव्ह म्हणून घोषित करण्यात आली आहे. यात वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे. अभयारण्याच्या सिमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत विस्तारीत क्षेत्र करुन ही गावे निश्‍चित केली आहेत. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली. 
राज्याने 16 सप्टेंबर 1985ला अधिसूचना काढून 351.16 चौ. किलो मीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले. 1986ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सिमेपासून 10 किलो मीटरपर्यंत संवेदनक्षेत्र राहील, अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे लोकांवर बंधने आली.

राज्य शासन, केंद्र शासनामार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उपवनसंरक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावे 15 हजार 039 हेक्‍टर क्षेत्र व सिंधुदुर्गमधील 15 गावे 10 हजार 26 हेक्‍टर क्षेत्र, असे एकूण 25 हजार 066 हेक्‍टर क्षेत्रावर इकोसेन्सिटीव झोन प्रस्तावित करून 9 ऑक्‍टोबर 2019ला केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. त्यावर 15 ऑक्‍टोबरला अधिसूचना प्रसिद्ध केली. राधानगरी अभयारण्याच्या सिमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत निश्‍चित केला. त्यामुळे राधानगरी अभयारण्यापासून 10 किलो मीटरच्या गावांमध्ये असणाऱ्या बंधनापासून थोडी सुटका मिळाली आहे. या अधिसुचनेमुळे सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्‍यामधील दुर्गानगर, येवतेश्‍वर, जांभळगाव, कणकवली तालुक्‍यातील नरडवे, रांजणगाव, नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, रामेश्‍वरनगर, गांधीनगर, हरकुळखुर्द, फोंडा, घोणसरी आणि वैभववाडी तालुक्‍यातील कुर्ली व शिराळे ही गावे इकोसेन्सिटिव्ह झाली आहे. 

दरम्यान, स्थानिकांना घरबांधणी आणि दुरुस्तीसाठी जमीन खुदाईला परवानगी असेल. राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारीत क्षेत्राच्या देखरेखीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 13 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचा प्रतिनिधी, राज्य शासनाद्वारे नियुक्त वन्यजीव संरक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ नगर योजनागार, महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, लोक निर्माण विभागाचा प्रतिनिधी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक, राज्य सरकार तर्फे नियुक्त पर्यारवण क्षेत्रातील विश्व विद्यालयातील पर्यावरण क्षेत्रातील विशेष तज्ञ, राज्य जैव विविधता बोर्डाचा सदस्य, सावंतवाडी विभागाचे उप वनसंरक्षक हे सदस्य तर कोल्हापूर विभागाचे उप वन संरक्षक हे सदस्य सचिव असणार आहेत. 

क्षेत्रफळ 250.66 चौ. कि.मी 
राधानगरी वन्यजीव अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पतीसह सस्तन प्राण्यांच्या 47 प्रजाती, सरीसुर्पांच्या 59 प्रजाती, उभयचर प्राण्यांच्या 20 आणि फुलपाखरांच्या 60 प्रजाती आढळतात. अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, जंगली कुत्रे, शेकरु, गवा, पटेरी वाघ, हत्ती आदी आढळतात. अभयारण्याच्या विस्ताराचे क्षेत्रफळ 250.66 चौ. कि.मी. आहे. या क्षेत्रात व्यावसायिक उत्खनन, प्रदूषण उत्पन्न करणारे उद्योग, जल विद्युत प्रकल्प, लाकूड गिरण्या, विटभट्टी, प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग, व्यावसायिक हॉटेल, प्रदूषण निर्माण करणारे लघु उद्योग, वृक्षतोड यावर निर्बंध आहे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 villages in Sindhudurg district are ecosensitive