राजापुरात दीडशे हेक्टरपेक्षा अधिक भातशेतीचे नुकसान ; कृषी विभागातर्फे पंचनामे सुरु

राजेंद्र बाईत
Saturday, 17 October 2020

संकटातील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे ओझे पाठीवर घेवून शेतकरी पुन्हा एकदा भातशेतीच्या कापणीच्या कामामध्ये गुंतला आहे.  

राजापूर : चक्रीवादळासह मुसळधार झालेल्या पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूरामध्ये काठावरील गावांसह अन्य भागातील सुमारे दीडशे हेक्टरहून अधिक भातशेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील यांनी व्यक्त केला आहे. भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे कामही हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, अस्मानी संकटातील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे ओझे पाठीवर घेवून शेतकरी पुन्हा एकदा भातशेतीच्या कापणीच्या कामामध्ये गुंतला आहे.  

हेही वाचा - परराज्यातील नौकांकडून होऊ शकते मासळीची लूट -

चक्रीवादळासह तालुक्यात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडला. त्यामध्ये तालुक्यातून वाहणार्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. या पूरस्थितीमध्ये दोन्ही नद्यांच्या काठावरील भातशेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये शीळ, चिखलगाव, गोठणेदोनिवडे, उन्हाळे, आंगले, गोवळ, पाचल, रायपाटण, तळवडे, शिवणे आदी भागातील भातशेती वाहून गेली. तर, झोडणी करून शेतातील खळ्यामध्ये ठेवलेले भाताच्या पिशव्याही पूरासोबत वाहून गेल्या. त्यातच, सुमारे आठ ते दहा तास भातशेती पूराच्या पाण्याखाली राहीली होती. 

कापणी केलेली भातशेतीसह झोडणी केल्यानंतरचे गवतही पूराच्या पाण्यासोबत वाहून जावून शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत पूराच्या पाण्यामुळे भातशेतीचे होणारे नुकसान वाचविण्याचा शेतकर्‍यांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, अस्मानी संकटापुढे शेतकर्‍यांचे प्रयत्न तोकडे ठरले. पूरस्थिती ओसरताच कृषी विभागाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण आणि पंचनामे करण्याला तातडीने सुरूवात केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी दिली. 

हेही वाचा -  रत्नागिरी नवदुर्गा स्पेशल स्टोरी :  दहा महिन्याच्या पोटच्या गोळ्याला बाजूला ठेवून सलग सहा महिने दिली रूग्णसेवा - 

भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाकडून आदेश प्राप्त झाले असून त्यानुसार कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि कर्मचार्‍यांमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमध्ये तालुक्यातील सुमारे दिडशे हेक्टरहून अधिक भातशेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या काही दिवसांमध्ये भातशेतीच्या नुकसानीच्या पंचनामे करण्याचे काम पूर्ण होणार असून त्याचा सविस्तर अहवाल वरीष्ठांमार्फत शासनाकडे पाठविणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे ओझे पाठीवर घेवून शेतकर्‍यांनी पुन्हा भातकापणीच्या कामाला सुरूवात केली आहे. त्यातून, शेतांमधील लगबग पुन्हा एकदा सुरू झाली आहे.  

दृष्टीक्षेपातील राजापूर तालुका 

- एकूण भौगोलीक क्षेत्र - 1,19,917 हेक्टर
- लागवडीचे क्षेत्र - 11814 हेक्टर 
   (खरीप- 11764 हेक्टर, रब्बी- 50 हेक्टर क्षेत्र)

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 hectares crop of rice are damages caused heavy rain in ratnagiri krushi officer checking this in konkan