जनतेचे रक्षकच संकटात, यंत्रणेपुढे मोठा पेच, जबाबदारी पेलण्याचे आव्हान

तुषार सावंत
Tuesday, 8 September 2020

पोलिस यंत्रणा दिवस-रात्र सतर्क झाली. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आणि दिवस-रात्र पहारा करणारी पोलिस यंत्रणा अलर्ट झाली.

कणकवली (सिंधुुदुर्ग) - जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य आणि संपत्ती सुरक्षित रहावयासाठी दिवस रात्र धडपडणाऱ्या पोलिस यंत्रणेला आता कोरोनाच्या संकटाने चांगलेच ग्रासले आहे. येथील पोलिस ठाण्यातील 60 पैकी 21 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलिस यंत्रणेचेही धाबे दणाणले आहेत. 

जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण मार्चमध्ये आढळल्यानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढली होती ती पोलिस यंत्रणेची. राज्य शासनाने लॉकडाउन सुरू केले आणि 21 मार्चला संपूर्ण जनता कर्फ्यू जाहीर झाला. त्यावेळेपासून पोलिस यंत्रणा दिवस-रात्र सतर्क झाली. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आणि दिवस-रात्र पहारा करणारी पोलिस यंत्रणा अलर्ट झाली.

बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी होऊ लागली. त्यावेळी पोलिस यंत्रणा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सक्षम होती; पण वयाची 55 वर्षे झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सक्तीने रजेवर पाठविले होते. अशा स्थितीत कणकवलीसारख्या मोठ्या पोलिस ठाण्याचा कारभार सुरू होता; पण गणेशोत्सवाचा कालावधी संपल्यानंतर या पोलिस स्टेशनमध्ये कोरोनाचा प्रवेश अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या आठ दिवसांत टप्प्याटप्प्याने येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत.

विशेष म्हणजे या सगळ्या कर्मचाऱ्यांची कोरोना स्वॅब चाचणी केली जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तसे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच पोलिस बाधित आढळले होते. त्यानंतर आकडा वाढत गेला आणि त्यांची संख्या आता 21 वर पोचली आहे. मुळात पोलिस कर्मचाऱ्यांचा तुटवडा, जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्या असल्या तरी तेथे वाढवावी लागलेली सुरक्षितता, मधल्या चार महिन्यांत थांबलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेली वाढ पाहता आता या पोलिस ठाण्याच्या निवडक कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार आल्याने पोलिसांवरही मोठे दडपण येऊ लागले आहे. 

दोन अधिकारी, कर्मचारी बाधित 
कणकवली पोलिस ठाण्याचे दोन आधिकारी आणि कर्मचारी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. येथील पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

29 कंटेन्मेंट झोन 
शहर आणि परिसरात 29 कंटेन्मेंट झोन ऍक्‍टीव्ह आहेत. अशा जवळच्या तीन ऍक्‍टीव्ह कंटेन्मेंट झोनसाठी एक पोलिस कर्मचारी दिला जात आहे. तर काही ठिकाणी पोलिसांना गस्तीच्या सूचना केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 police corona positive in kankavli sindhudurg