रत्नागिरीत 24 तासात सापडले 31 कोरोना बाधित : संख्या पोहचली आठ हजारवर

राजेश कळंबट्टे
Sunday, 11 October 2020

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 293 झाली.

रत्नागिरी :  जिल्ह्यात मागील 24 तासात नवीन 31 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून बाधितांचा एकुण आकडा आठ हजारवर पोचला आहे. गेल्या तिन दिवसात मृतांच्या संख्येतही घट झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 293 झाली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची आकडेवारी कमी झालेली आहे. गणेशोत्सवानंतर दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढत होता. प्रचार, प्रसिध्दीसह कोरोना बाधितांवरील उपचारांमुळे हे प्रमाण हळूहळू कमी होत आहे; परंतु तुलनेत बाधितांमधील मृतांचे प्रमाण वाढत होते. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.66 टक्केवर पोचला आहे. मागील काही दिवसांमध्ये दररोज चार ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यात खासगी रुग्णालयातील रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या तिन दिवसात हे चित्र बदलत आहे.

हेही वाचा- Photo : कोकणात मुसळधार ; मळ्यातच भात कुजण्याची भिती -

प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. रविवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजची नोंद ही शनिवारी मृत पावलेल्या रुग्णाची असून तो संगमेश्‍वर तालुक्यातील आहे. ही दिलासादायक बाब आहे. राज्य शासनाकडून मृत्यदर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. उशिरा दाखल होत असलेल्या रुग्णांमुळे मृत्यूदर वाढत आहेत.

जिल्ह्यात मागील चोविस तासात तपासलेल्या रुग्णांची संख्याही कमी आहे. त्यातील 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 31 जणं पॉझिटीव्ह आहेत. यामध्ये 17 आरटीपीसीआर तर 14 अ‍ॅण्टीजेनमधील आहेत. दापोलीत 2, खेड 3, गुहागर 2, चिपळूण 13, संगमेश्‍वर 1, रत्नागिरी 6, लांजा 1, राजापूर 3 रुग्ण नवीन बाधितांमध्ये आहेत. एप्रिल महिन्यात कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात सापडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन महिन्यात उच्चांकी रुग्ण सापडले. ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण कमी होऊ लागले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 8 हजार 4 रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात 46 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7 हजार 117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 88. 91 टक्के आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 24 hours 31 new corona infected patients found and the total number of infected has reached eight thousand