चिंता वाढली - रत्नागिरीत दिवसभरात २५ नवे कोरोना रूग्ण 

राजेश कळंबट्टे 
गुरुवार, 9 जुलै 2020

गुरुवारी दिवसभरात 25 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.

रत्नागिरी - बुधवारी एकच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रत्नागिरीकरांना थोडासा दिलासा मिळाला होता; मात्र गुरुवारी दिवसभरात 25 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात आढळलेल्या दोन रुग्णांमध्ये कोविड योध्दे म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस आणि नर्सचा समावेश आहे. 

कोविड रुग्णालयातील कोरोना पॉझिटीव्ह येणार्‍यांची संख्या वाढत असल्याने तेथील प्रशासनावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. 

गुरुवारी (ता. 9) सकाळपासून 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 839  झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 2, कामथे उपजिल्हा रुग्णालय 9, राजापूर 9, मंडणगड 1, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय 4 रुग्ण आहेत. राजापूर तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने शिरकाव होत असल्याने चिंतेची बाब ठरली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढणारी कोरोनाची संख्या चिंतेची बाब ठरली होती. मात्र बुधवारी रात्री दोनशे अहवालांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह सापडल्याने दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अवघ्या काही तासांचा ठरला आहे. जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 277 इतकी आहे. रुग्ण आढळून आल्यामुळे रत्नागिरीतील बीएसएनएल वसाहत, जेल रोड हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 534 झाली असून आज जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 1 रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण येथून 8, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल येथून 3 अशा एकूण 12  रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

हे पण वाचा आगामी काळात राजापूरचा आमदार भाजपचाच.....  

 

एकूण पॉझिटिव्ह  839

बरे झालेले 534

मृत्यू  28

कन्टेंनमेन्ट झोन 75

संस्थात्मक 75

होम क्वॉरंटाईन  15,822

संपादना - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 new corona positive case in ratnagiri