रत्नागिरीकरांची तब्बल २८ कोटींची फसवणूक ; तीन संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

जिल्ह्यात यात सुमारे २८ कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

रत्नागिरी : अथर्व फॉर यू इन्फ्रा ॲण्ड ॲग्रो प्रायव्हेट लि. या कंपनीकडून गुंतवणूकदारांना सुमारे ९०० कोटींचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी तालुक्‍यातून तक्रार अर्ज दाखल झाले. जिल्ह्यात यात सुमारे २८ कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. यात जमीन, फ्लॅट आदींचा समावेश आहे. मात्र, एकत्रित गुन्हा मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असल्याने तिकडेच तक्रार दाखल करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - अजित पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

जिल्ह्यात या कंपनीची रत्नागिरी, चिपळूण, दापोली आदी ठिकाणी कार्यालये होती. ती काही महिने बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले. गेली दोन वर्षे कंपनीचे रत्नागिरीतील कार्यालय बंद आहे. या प्रकरणी केळ्येमधून एक तक्रार अर्ज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला. हळूहळू तक्रारी येण्यास सुरवात झाली आहे. मात्र, राज्यभरातील एकत्रित गुन्हा मुंबई आर्थिक शाखेकडे दाखल करण्यात आला. त्यामुळे तक्रारदारांनी तिकडे तक्रार दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत जिल्ह्यात सुमारे २८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे कंपनीच्या एजंटकडून सांगण्यात आले. मात्र, किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, ते समजू शकले नाही. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी कंपनीने आपल्या शाखा सुरू केल्या. कंपनीकडून गुंतवणूकदारांना दुप्पट व तिप्पट रकमेच्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

हेही वाचा -  नव्या साखरेची निर्यात कारखान्यांना फायदेशीर ;  दरात क्विंटलला 850 रुपयांची वाढ -

अथर्व कंपनीकडून एजंट नेमून गुंतवणूकदारांना प्रलोभने दाखविण्यात आली. गुंतवणूकदारांचा परतावा देणे अशक्‍य होऊ लागताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून पोबारा केला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सुरवात झाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

तीन संशयितांना अटक

२२ ऑक्‍टोबरला दहिसर परिसरातून या कंपनीचे अधिकारी सूरदास पाटील (वय ४८), सुखदेव म्हात्रे (४१) व सुभाष नाईक (४०) या संशयितांना अटक करण्यात आली. कंपनीचे संचालक शिवाजी नेफाडे, गणेश हजारे, सचिन गोसावी, मुकेश सुदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी कृषी, शैक्षणिक, आरोग्य, शेळीपालन, आयुर्वेदिक प्रसाधने, औषधे आदी प्रकारांमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे सांगत होती. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 crore rupees fraud in company cheated by people in ratnagiri