रत्नागिरी जिल्ह्यातील 286 प्राथमिक शाळा बंद ; ही आहेत कारणे 

अशोक कदम
Sunday, 13 September 2020

शासनाच्या वित्त विभागानेही 30 जून व 8 ऑगस्ट 2017 च्या पत्रातही अल्प उपस्थिती व आवश्‍यकता तपासून शाळा बंद करण्यात यावी. मुलांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करावे, असे सुचविले.

आरवली ( रत्नागिरी) -  जिल्ह्यातील 0 ते 5 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या 286 प्राथमिक शाळा बंद करून त्यामधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समिती बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये 27 उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून होत आहे. तसे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे यांनी दिले आहेत. 

नजिकच्या शाळेत समायोजन 
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 13 डिसेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांत विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या शाळेत समायोजन होत नसेल तर विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान देऊन त्यांना दुसऱ्या शाळेत समायोजित करावे, असा निर्णय झाला. शासनाच्या वित्त विभागानेही 30 जून व 8 ऑगस्ट 2017 च्या पत्रातही अल्प उपस्थिती व आवश्‍यकता तपासून शाळा बंद करण्यात यावी. मुलांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करावे, असे सुचविले. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या गुरुवारी (ता. 10) झालेल्या बैठकीत 0 ते 5 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शाळा बंदची अशी आहेत कारणे 

  • 0 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळेत मुलांना सामाजिक व शैक्षणिक कौशल्ये संपादन होत नाहीत. 
  • मुलांचा सर्वांगीण व व्यक्तीमत्व विकास होत नाही. 
  • मुलांना सहशालेय उपक्रमात सहभागी होता येत नाही. 
  • मुलांच्या अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो. 
  •  मुले एकाकी, एकलकोंडी होतात. 
  • मुलांच्या मानसिक विकासात अडचणी येतात. 
  • कला, क्रीडा, कार्यानुभव, हस्तकला, स्पर्धा, विविध गुणदर्शन आदी कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना वाव मिळत नाही. 

0 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय स्तुत्य आहे. या विद्यार्थ्यांचे समायोजन मोठ्या शाळेत झाल्यास त्यांचा गुणात्मक विकास होईल. शाळा टिकवण्यासाठी निकोप स्पर्धा होईल. 
- विवेक कदम, शिक्षणप्रेमी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 286 Primary Schools Closed In Ratnagiri District