esakal | रत्नागिरीत पावसाने मारली 'इतकी' मजल
sakal

बोलून बातमी शोधा

3000 millimeter rain register in ratnagiri

भात, नाचणी रोपे उंच वाढली असून वाऱ्यावर डोलू लागली आहेत

रत्नागिरीत पावसाने मारली 'इतकी' मजल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : ‘मघाच्या सरींनो, याहो माहेराला....’ या काव्यपंक्तीचा प्रत्यय येणारा पाऊस मंडणगड तालुक्‍यात कोसळत आहे. श्रावणात चांगला पाऊस पडत असून तालुक्‍यात १८ ऑगस्टपर्यंत ३,१२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाच दिवसांपासून रोज सरासरी ५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडत असून त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. भात, नाचणी रोपे उंच वाढली असून वाऱ्यावर डोलू लागली आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत येणाऱ्यांनो नियम पाळा, अन्यथा `पूनश्च हरिओम`... 

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र पाहुणेरपण सुरू असून आपल्या मुलींना माहेरी आणण्यासाठी पारंपरिक सुपे पोहचविणे सुरू आहे. श्रावण महिना सुरू असला तरी पावसाने आपली उघडीप दिलेली नाही. दिवसभर संततधार चालूच ठेवली आहे. दिवसभर एकामागून एक जोरदार सरी कोसळल्याने शेतात पाणी साचून अनेक ठिकाणी जलमय वातावरण झाले होते.

पिकांना पोषक पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. विविध वनस्पती फुलोऱ्यावर आल्या आहेत. मघांचा पाऊस भातपीक वाढीसाठी अतिशय फायदेशीर असतो. सर्वत्र हिरवळ दिसत असून पिके बहरू लागली आहेत. भातरोपांना फुटवे फुटल्याने बुंध्याशी पुंजके दिसू लागले आहेत. शेताच्या बांधावरील गवत काढणीची कामे पूर्ण झाली असून शेतामधून पक्षी भिरभिरताना दिसू लागले आहेत. विविध वनस्पती, फुलझाडे, फळझाडे फुलोऱ्यावर आल्याने निसर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

धरणांचे विसर्ग जोरात
कोसळणाऱ्या श्रावणातील मघासरींमुळे तुळशी, भोळवली, पणदेरी, तिडे धरणांचा विसर्ग पुन्हा जोरात सुरू झाला आहे. त्यातून धरणातील मासे, खेकडी खाली झेपावत असल्याने हौशी ग्रामस्थ व खवय्ये ते पकडण्यासाठी जात आहेत. भारजा, निवळी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. धबधबे, ओढ्यांचे पाणी वाढल्याने होणारा आवाज लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा -  उल्लेखनीय! 1,219 गावांनी रोखले कोरोनाला , कोणता आहे हा जिल्हा? वाचा 

* 13 ऑगस्ट - मंडणगड, 81 मि.मी, म्हाप्रळ 39 मि. मी, देव्हारे 48 सरासरी पाऊस 56 मि. मी

* 14 ऑगस्ट - मंडणगड 73 मि. मी, म्हाप्रळ 65 मि. मी, देव्हारे  सरासरी पाऊस 52 मि. मी

* 16 ऑगस्ट - मंडणगड 115 मि. मी,  म्हाप्रळ 79 मि. मी, देव्हारे 83 सरासरी पाऊस 92 मि. मी

* 17 ऑगस्ट - मंडणगड 64 मि. मी, म्हाप्रळ 90 मि. मी, देव्हारे 70 सरासरी पाऊस 74 मि. मी

* 18 ऑगस्ट - मंडणगड 95 मि. मी, माप 70 मि. मी, देव्हारे 53 सरासरी पाऊस  72 मि. मी. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image