आयसोलेशनमध्ये आणखी 12 जण ; सिंधुदुर्गात 33 अहवालांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षातील 12 रुग्ण वाढले असून, सध्या 60 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. 
आचरा येथील होम क्वारंटाईन केलेल्या एका वयस्कर महिलेचे निधन झाले आहे; मात्र तिचा कोरोना आजाराशी संबंध नाही, तरीही तिचा नमुना तपासणीसाठी पाठविला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. 

ओरोस - सिंधुदुर्गातून आज नव्याने 11 नमुने तपासणीसाठी मिरजेला पाठविले. मंगळवार (ता.21) प्रलंबित 37 पैकी 15 अहवाल आज मिळाले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. कालचे प्रलंबित 22 व आज नव्याने पाठविलेले 11 असे 33 अहवाल प्रलंबित आहेत. आज जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षातील 12 रुग्ण वाढले असून, सध्या 60 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. 
आचरा येथील होम क्वारंटाईन केलेल्या एका वयस्कर महिलेचे निधन झाले आहे; मात्र तिचा कोरोना आजाराशी संबंध नाही, तरीही तिचा नमुना तपासणीसाठी पाठविला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. 

जिल्ह्यात सध्या 423 जण होम क्वारंटाईन, तर संस्थात्मक क्वारंटाईन 60 जण आहेत. आतापर्यंत 208 नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी 175 अहवाल मिळाले. केवळ एकच नमुना पॉझिटिव्ह होता. तो रुग्णसुद्धा बरा होऊन घरी परतला आहे. अद्याप 33 नमुने प्रलंबित आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात सध्या 60 जण उपचार घेत आहेत. दिवसभर आरोग्य यंत्रणेमार्फत दोन हजार 238 व्यक्तींची तपासणी केली आहे. लॉकडाउन कालावधीत जिल्ह्यातील सहा निवारा केंद्रांमधील व्यक्तींची तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या पथकामार्फत करण्यात आली. यावेळी 242 रुग्णांची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. 

खते, बियाण्यांची खरेदी सुरू करा 
खरिपासाठीच्या बियाणे व खते जिल्ह्यात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी खरेदी सुरू करावी. त्यावेळी सामाजिक अंतराचे पालन करावे, गर्दी करू नये. शेतकऱ्यांनी खरेदी सुरू केली तर काही कमतरता जाणवल्यास ती लगेच दूर करता येईल व पुरवठ्यामध्ये सुटसुटीतपणा आणता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने केले आहे. 

क्वारंटाईन केलेल्या महिलेचे निधन 
आचरा येथे 11 एप्रिलला एक 75 वर्षीय महिला व तिच्यासोबत अन्य दोन व्यक्ती आल्या होत्या. या तिन्ही व्यक्ती परजिल्ह्यातून आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील वयोवृद्ध असलेल्या 75 वर्षीय महिलेचे आज सकाळी निधन झाले. याबाबत शल्यचिकित्सक डॉ. चाकुरकर यांना विचारले असता, ती महिला वयोवृद्ध होती. तिला अन्य आजार होते. तिला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, तरीही आपल्या यंत्रणेकडून तिचा नमुना मिरज येथे तपासणीसाठी पाठविला आहे, असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33 corona report as wetting in sindhudurg