रत्नागिरीत आढळले अतिसाराचे ३६ रूग्ण 

राजेश कळंबटे 
Wednesday, 25 November 2020

पाचेरी आगर येथील भवडवाडी, हुमणेवाडी आणि गुरववाडीत 23 नोव्हेंबरला अतिसाराचे 36 रुग्ण आढळून आले

रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील पाचेरी आगार येथे अतिसाराचे 36 रुग्ण आढळले आहेत. त्यांची प्रकृती स्थीर असून या साथीमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून साथ नियंत्रणासाठी आरोग्यचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. साथ नियंत्रणाखाली आहे; मात्र त्याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. 

साथीचे कारण शोधण्यासाठी पाण्याचे नमुने तपासण्यात येणार असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

पाचेरी आगर येथील भवडवाडी, हुमणेवाडी आणि गुरववाडीत 23 नोव्हेंबरला अतिसाराचे 36 रुग्ण आढळून आले. गुहागरचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. जांगीड यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर जिल्हास्तरावरुन वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबे, डॉ. गुंजवटे, तळवलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख आणि आरोग्य कर्मचारी विशाल राणे, अजय हळे, समीर हालीम, शरद गडदे, वैभव गडदे यांना साथ रोग नियंत्राणासाठी पाचेरी येथे पाठविण्यात आले. या पथकाने साथग्रस्त भागात दैनंदीन सर्वेक्षण आणि नवीन रुग्ण शोधणे, जुन्या रुग्णांशी तपासणी, पाणी शुध्दीकरण, ओटी टेस्ट व आरोग्य शिक्षण आदींची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.

डॉ. कमलापूरकर यांनी अतिसार प्रतिबंधक पोचरी आगार येथील उपाययोजनांचा आढावा घेतला आणि साथ नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. ग्रामपंचायत पाचेरी आगर कार्यालयाला भेट देऊन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा साधनांची पाहणी त्यांनी केली. नळ पाणी योजनेच्या पाईप लाईनच्या गळतीविषयी पाहणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले आहेत. आजारी पडलेले तिन्ही वाड्यातील लोक एकाच विहीरीचे पाणी वापरत असल्याचे पुढे आले आहे. 

हे पण वाचा - ब्रेकिंग- रत्नागिरीत बंद घर फोडून अकरा तोळे सोन्यासह रोकड लंपास

तिन्ही वाड्यांमधील पाण्याचे चार नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. ग्रामपंचायतमधील टीसीएल नमुना तपासणी करुन ते प्रमाणित केले जाणार आहेत. तसेच नवीन रुग्णांच्या शौचाचे नमुने घेऊन त्यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. गंभीर आजाराच्या रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 diarrhea patients found in Ratnagiri