सिंधुदुर्गात नवे ५१ जण कोरोना बाधित, एकाचा मृत्यू

विनोद दळवी
Tuesday, 15 September 2020

कोरोना तपासणी केंद्राकडे मंगळवारी नव्याने 334 स्वॅब आले.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळी संख्या 46 झाली आहे. नव्याने 51 व्यक्तींचे अहवाल बाधित आल्याने एकूण संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. आणखी 47 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या एक हजार 491 झाली. 

जिल्ह्यात काल (ता.14) 47 व्यक्तींचा अहवाल बाधित आला होता. त्यामुळे दुपारपर्यंत एकूण बाधित संख्या दोन हजार 469 झाली होती. त्यानंतर आज दुपारपर्यंत 277 अहवाल प्राप्त झाले. यातील 226 अहवाल निगेटिव्ह आले तर 51 अहवाल बाधित आले. त्यामुळे जिल्ह्याच्या बाधित संख्येचा आकडा वाढून तो दोन हजार 520 झाला आहे. या सर्व रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. 

कोरोना तपासणी केंद्राकडे नव्याने 334 स्वॅब आले. त्यामुळे नमूने संख्या 20 हजार 692 झाली. यातील 20 हजार 54 अहवाल आले. त्यातील 17 हजार 534 अहवाल निगेटिव्ह आहेत. 638 प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 983 आहेत.

संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये दुसऱ्या दिवशीही वाढ
संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये 71 व्यक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे येथील संख्या 20 हजार 907 झाली. गाव पातळीवरील गृह व संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 22 व्यक्ती वाढल्या. तेथील संख्या आठ हजार 345 आहे. नागरी क्षेत्रातील 49 व्यक्ती वाढल्याने तेथील संख्या 12 हजार 562 झाली. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 new corona patients, one dies in Sindhudurg