सिंधुदुर्गात बचतगटांना ६१ कोटींचे कर्ज

ग्रामीण जीवनोन्नती : महिला सबलीकरणाला बॅंकांची साथ
 61 crore loan to mahila bachat gat Sindhudurg
61 crore loan to mahila bachat gat SindhudurgEsakal

ओरोस : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत कार्यरत असलेल्या बचतगट, समूह यांना यावर्षी जिल्ह्यातील बँकांची मोठी साथ लाभली आहे. तब्बल ६१ कोटी ५३ लाख २९ हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. यामुळे कर्ज वितरणात जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी असून, उद्दिष्टाच्या १४६.५१ टक्के काम झाले आहे. यात सर्वाधिक बँक ऑफ इंडिया या बँकेने १९ कोटी १४ लाख ९९ हजार रुपये एवढे कर्ज वितरण केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी २ हजार ९३० बचतगट किंवा समूह मिळून ४२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. यातील २३ मार्चपर्यंत २ हजार ६५४ गटांना ६१ कोटी ५३ लाख २९ हजार रुपये एवढे कर्ज वितरण करण्यात आले आहे. कर्ज वितरणाचे काम १४६.५१ टक्के झाले आहे; मात्र बचतगट किंवा समूह यांचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यास यश आलेले नाही. ९०.५८ टक्के एवढे काम झाले आहे. २ हजार ९३० एवढे उद्दिष्ट असताना २ हजार ६५४ एवढ्या गटांना कर्ज वितरण झाले आहे. त्यामुळे या उद्दिष्टात यंत्रणेला अजून काम करावे लागणार आहे. जास्तीत जास्त गट किंवा समूह यांचे कर्ज प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.

बँकांचे मोठे सहकार्य

केंद्र व राज्य शासनाचे बचतगटांना कर्ज वितरण करण्याचे सक्त आदेश आहेत. तरीही बँका कर्ज प्रस्ताव मंजूर करीत नसल्याची ओरड असायची. परिणामी बचतगट समूह बँकांकडे कर्ज प्रस्ताव करू पाहत नव्हते; परंतु यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी बँका, पब्लिक सेक्टर बँका, विभागीय ग्रामीण बँक व खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज प्रस्ताव मंजूर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक-एक कोटी ६३ लाख ७८ हजार रुपये, बँक ऑफ बडोदा-२ कोटी ४२ लाख ८९ हजार रुपये, बँक ऑफ इंडिया-१९ कोटी १४ लाख ९९ हजार रुपये, बँक ऑफ महाराष्ट्र-९ कोटी ५५ लाख २० हजार रुपये, कँनरा बँक- २ कोटी ४८ लाख ४७ हजार रुपये, सेंट्रल बँक ऑफ इंडिया-१ कोटी ६२ लाख ८४ हजार रुपये, आयडीबीआय बँक लिमिटेड-एक कोटी ६२ लाख ३५ हजार रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया-एक कोटी ४८ लाख २० हजार रुपये, युको बँक-तीन लाख रुपये, युनियन बँक ऑफ इंडिया-तीन कोटी ५ लाख २२ हजार रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँक-५ कोटी ३३ लाख ८० हजार रुपये, एचडीएफसी बँक-१० कोटी ५ लाख ८७ हजार रुपये, आयसीआयसी बँक-३ कोटी ६ लाख ६८ हजार रुपये अशाप्रकारे कर्ज वितरण केले आहे.

बँकांनी प्रतिसाद दिल्याने प्रस्ताव मंजूर

कर्ज वितरण काम १४६.५१ टक्के झाल्याचे सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांनी जिल्ह्यातील बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी जास्तीतजास्त कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला बँकांनी प्रतिसाद दिल्याने ६१ कोटी ५३ लाख २९ हजार रुपयांचे कर्ज प्रस्ताव मंजूर झाल्याचे जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार म्हणाले.

बँक ऑफ इंडियाचे मिशन मोडवर काम

बँक ऑफ इंडिया या बँकेने यावर्षी जिल्ह्यात मिशन मोडवर काम करीत कर्ज प्रस्ताव मंजूर केले आहेत. जानेवारी २०२२ पासून २१ मार्चपर्यंत पाच कॅम्प आयोजित केले होते. दररोज बचतगट किंवा समूह यांना कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे एक दिवस पूर्ण शाखांमध्ये ‘एसएचजी लोगिंग डे’ आयोजित करीत परिपूर्ण प्रस्तावांना कर्ज मंजुरी या दिवशी दिली. तब्बल ७३८ बचतगट, समूह यांना १९ कोटी १४ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ इंडिया जिल्हा व्यवस्थापक तथा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक पी. के. प्रामाणिक, स्टार कृषी विकास केंद्रप्रमुख ऋषिकेश गावडे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

तीन ते पाच लाख कर्ज वितरण

याबाबत बोलताना उमेद जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार यांनी, बचतगटांना पहिले एक लाखाचे, दुसरे दोन लाखांचे तर तिसरे तीन ते पाच लाखांचे कर्ज वितरण केले जाते. यावर्षी जिल्ह्यात झालेले कर्ज वितरण तिसऱ्या टप्प्यातील असून, तीन ते पाच लाखांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक अकरा लाखांच्या कर्ज प्रस्तावांचा समावेश आहे, असे सांगितले.

राज्यात सध्या नाशिक एक, तर अकोला दोन नंबरला आहे. सिंधुदुर्ग तिसऱ्या स्थानी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापेक्षा जात संख्येने कर्ज वितरण झाले आहे; मात्र बँकांनी अद्याप याबाबत ऑनलाईन माहिती अपलोड केलेली नाही. उर्वरित दिवसांत अजून प्रस्ताव मंजूर होतील. सर्व माहिती ऑनलाईन फीड झाल्यावर सिंधुदुर्ग राज्यात प्रथम दिसेल.’’

- राजेंद्र पराडकर, प्रकल्प संचालक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com