
आंबा हे कोकणातील प्रमुख पीक आहे. बागायतदार जीआय नोंदणीसाठी पुढे येत नसल्यामुळे परराज्यातील आंबा विक्रेत्यांना घुसखोरीसाठी बाजारपेठ खुलीच राहणार आहे.
रत्नागिरी - नवीन हंगाम सुरू झाला तरीही कोकणातील आंबा बागायतदारांकडून जीआय मानांकनासाठी तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत 650 आंबा बागायतदार आणि 275 प्रकियादारांनी जीआय मानांकनासाठी नोंदणी केली आहे. हापूसच्या नावावर होणारी आंबा विक्री रोखण्यासाठी जीआय हा एकमेव पर्याय आहे.
आंबा हे कोकणातील प्रमुख पीक आहे. बागायतदार जीआय नोंदणीसाठी पुढे येत नसल्यामुळे परराज्यातील आंबा विक्रेत्यांना घुसखोरीसाठी बाजारपेठ खुलीच राहणार आहे. जीआय नोंदणी करण्यासाठी कोकणात प्रत्येक जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोकणातील पाच जिल्ह्यातील आंब्याला हापूस जीआय मिळाले.
हापूसचा टॅग वापरायचा असल्यास संबधित आंबा उत्पादक, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांना विहित शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी हापूस नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने जीआयची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.
कोकणातील पाचही जिल्ह्यात मिळून 40 ते 50 हजार आंबा बागायतदार आहेत. आतापर्यंत जीआय नोंदणीसाठी प्रक्रियादार आणि बागायतदार मिळून सव्वानऊशे जणांची नोंदणी झाली आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नोंदणीचे काम पूर्णतः स्थगित झाले होते. यंदा या नोंदणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी काही दिवस आधी सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले होते. बेकायदेशीरपणे आंब्याला हापूस हे नाव वापरले गेले तर त्या विरुद्ध कठोर कारवाई करणे शक्य होणार आहे.
या चार संस्थांकडे नोंदणी
हापूस टॅग वापरण्यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केणशी आंबा उत्पादक संघ यांच्यापैकी कोणाकडेही नोंदणी करणे आवश्यक आहे. या चार संस्था आता भौगोलिक निर्देशनप्राप्त हापूसच्या मालक संस्था आहेत.