रत्नागिरीतील ७२ डॉक्‍टरांचा चार महिने कोरोनाशी लढा पगाराविनाच

राजेश कळंबटे
Sunday, 20 September 2020

योद्‌ध्यांची मानसिकता चांगली राहण्यासाठी त्यांना सुविधा आणि पगार वेळच्या वेळी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

रत्नागिरी : कोरोना योद्धा म्हणून जीव धोक्‍यात टाकून राष्ट्रीय आपत्तीला तोंड देणारे डॉक्‍टर सध्या वेगळ्याच समस्येला तोंड देत आहेत. 11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने नेमलेले डॉक्‍टर कोविड योद्धा म्हणून लढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोविड योद्‌ध्यांना सुविधा व वेतन वेळेवर द्या, असे आदेश शासनाला दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील 72 डॉक्‍टर आणि काही परिचारिका चार महिने पगाराविना आहेत. त्यामुळे या योद्‌ध्यांची मानसिकता ढासळू लागली असून, शासनाने दखल घेण्याची मागणी केली आहे. 

जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडतोय. बाधित किंवा संशयितांना क्वारंटाईन सेंटर किंवा कोविड रुग्णालयात योग्य उपचार मिळावेत, यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. म्हणून शासनाने 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्‍ट पद्धतीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. जिल्ह्यात असे 72 वैद्यकीय अधिकारी कोविड योद्धा म्हणून जीवाची पर्वा न करता लढत आहेत. या योद्‌ध्यांची मानसिकता चांगली राहण्यासाठी त्यांना सुविधा आणि पगार वेळच्या वेळी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील हे 72 कोरोना योद्धा गेले चार महिने पगाराविना आहेत. आतापर्यंत त्यांची कोणती तक्रार नव्हती. मात्र, आता त्यांचेही आर्थिक बजेट कोलमडले असून, मानसिकता ढासळू लागली आहे. 

कोरोनाची लागण होणार नाही, याची दक्षता घेऊन दबावाखाली डॉक्‍टर काम करीत आहेत. ड्युटी करून धोका पत्करणारे, कुटुंबापासून लांब राहणारे हे डॉक्‍टर आज गेले चार महिने पगाराविना आहेत. याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, की शासनाकडून कोविड अनुदान न आल्याने डॉक्‍टरांचे पगार रखडले आहेत. त्यापैकी काहींचे झाले आहेत. अनुदान लवकर मिळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 

सेवेत तरी कायम करून घ्या 
अकरा महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्‍ट पद्धतीवर नेमलेल्या या डॉक्‍टरांना चार महिने पगार नाहीच. त्यात 11 महिन्यांनी पुन्हा काय, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेच. त्यामुळे शासनाने या कोविड योद्‌ध्यांना सेवेत कायम करून घ्यावे, अशी मागणीही होत आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72 doctors from Ratnagiri fighting with Corona for four months without pay