Independence Day : लवकरच कोरोनावर मात करु ; ॲड. अनिल परब

राजेश कळंबट्टे
Saturday, 15 August 2020

कोरोनाच्या संकट काळात सहकार्य करणाऱ्या आणि झोकून देऊन काम करणाऱ्या कोरोना योध्दांचे मी अभिनंदन करतो.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आलं. या आपत्तीच्या परिस्थितीत शासन खंबीरपणे उभे आहे. संकटावर मात करत जिल्हा नव्याने उभा करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी आज केले.

74 वा स्वातंत्र्यदिना निमित्त जिल्हयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री ॲड. परब यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दूमती जाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळयास जि.प. अध्यक्ष रोहण बने, सभापती बाबू म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडयाशेट साळवी तसेच जि. प. सदस्य आणि नगरसेवकांचीही उपस्थिती होती.

हेही वाचा - शासनाच्या निकषांमुळे गोची; हानी लाखाची, भरपाई सहाच हजार...

लॉकडाऊनच्या काळात शासनाने वेगळया बदलांसह गरीब जनतेला धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडली. शासन सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे ॲङ परब म्हणाले. निसर्ग चक्रीवादळाच्या काळात नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापासून सर्व उपाययोजनांची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली याबद्दल मी प्रशासनाचे तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे विशेष अभिनंदन करतो.  

ते म्हणाले, चक्रीवादळमुळे नुकसान झालेल्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरंभीच 100 कोटी जाहिर केले होते. आपत्ती प्राधिकरणाचे नियम बदलून अधिकाधिक नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई मिळावी यासाठी शासनाने मदतीचे निकष बदलले तसेच झाडनिहाय भरपाईचेही धोरण अंगिकारले. जिल्हयात आतापर्यंत 116.98 कोटी रुपये बाधितांसाठी आले आहेत. त्यातील 77.35 कोटी रुपये मदत स्वरुपात देण्यात आले. अतिरिक्त 71.88 कोटीची मागणी पूर्ण करण्याची शासनाची भूमिका आहे.

हेही वाचा - कंत्राटी डॉक्‍टरांची उपासमारी, वित्त समिती सभेत काय झालीय चर्चा? 

आपण कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीत आहोत. यात सहकार्य करणाऱ्या आणि झोकून देऊन काम करणाऱ्या कोरोना योध्दांचे मी अभिनंदन करतो. कोरोना काळात गणेशोत्सवास येणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाने सुविधा केल्या आहेत. आत्मनिर्भर भारताचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. 

निसर्गाने रत्नागिरीला सुंदर अशा सागरकिनाऱ्यांची देणगी दिली आहे. येणाऱ्या काळात गणपतीपुळे, आरे-वारे येथे स्थानिकांना संधी निर्माण करुन देण्याचे काम पर्यटन विभाग आणि एम.टी.डी.सी च्या माध्यमातून या सुविधा येथे निर्माण केल्या जातील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी कोरोनाच्या बाबतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या  अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 74th independence day celebrated in ratnagiri and guest ad. anil parab